रिक्षाचा प्रवास... चक्क फुक्काट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 16:14 IST2017-09-02T16:10:01+5:302017-09-02T16:14:39+5:30
साकुरी : स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही गावात अद्याप सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही़ त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करुन बक्कळ पैसा कमविण्याची संधी ...

रिक्षाचा प्रवास... चक्क फुक्काट
साकुरी : स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही गावात अद्याप सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही़ त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करुन बक्कळ पैसा कमविण्याची संधी असताना एका तरुणाने चक्क गावक-यांना मोफत रिक्षासेवा सुरु केली आहे़ खडकेवाके ते राहाता असा सहा किलोमीटरचा प्रवास चक्क फुक्कट करण्यास मिळू लागल्यामुळे गावात आनंदीआनंद आहे़
राहाता तालुक्यातील खडकेवाके हे जेमतेम लोकसंख्येचे गाव. स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही गावात अद्याप एस़टी़ बस येत नाही़ खासगी प्रवासी वाहतुकीचीही सुविधा नाही़ राहाता हे शहर अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असूनही गावकºयांना बाजाराला येण्या-जाण्यासाठी अनेकांच्या हाता-पाया पडून लिफ्ट मागावी लागते़ लिफ्ट मिळाली तर ठीक अन्यथा राहात्याची वारी ही पायीच ठरलेली़ त्यात आठवड्याचा बाजार करुन तो बोजा पाठीवर घेऊन येणे म्हणजे डोंगर उचलूनच गाव गाठल्यासारखे़ गावक-यांच्या वेदना जाणून खडकेवाके येथील सचिन मुरादे पाटील या तरुणाने गावक-यांसाठी चक्क मोफत रिक्षा सेवा सुरु केली़ गुरुवारी आठवडे बाजाराचे औचित्य साधून राहाता पंचायत समितीचे उपसभापती बाबासाहेब म्हस्के यांच्या हस्ते या मोफत रिक्षा सेवेचा प्रारंभ करण्यात आला़ खडकेवाके ग्रामस्थांना आठवडे बाजारात येण्या-जाण्यासाठी सचिन मुरादे या तरुणाने चक्क चार रिक्षा खरेदी केल्या़ या रिक्षांच्या माध्यमातून त्याला बक्कळ पैसा कमावण्याची संधी असताना त्याने चक्क चारही रिक्षांमधून ग्रामस्थांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे़ त्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे़