अहमदनगर : नगर शहराची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली असून, शुक्रवारी दिवसभरात अवघे पाच रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांनी घाबरू नये. महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर येऊन लस घ्यावी, असे आवाहन आयुक्त शंकर गोरे यांनी केेले.
आयुक्त गोरे म्हणाले, ग्रामीण भागासह शहरातील कोरोना रुग्णांची नोंद शासनाच्या पोर्टलवर नियमित केली जाते. शुक्रवारी चुकून ग्रामीण भागातील रुग्णांची नोंद नगर शहराच्या यादीत झाली. त्यामुळे अचानक ६४ रुग्णांची भर पडली. याबाबत आरोग्य विभागाने तपासणी केली असता नगर शहरात दिवसभरात अवघे पाच रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. शुक्रवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे. कोराेनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे. गर्दी न करता यंदाचा गणेशोत्सव साजरा करावा, असे गोरे म्हणाले.
महापालिकेच्या वतीने कोरोना मिशन झिरो माेहीम राबविण्यात येत आहेत. चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून, शासनाकडून लसही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागली आहे. शनिवारी महापालिकेच्या सात आरोग्य केंद्रांवर प्रत्येकी ९०० डोस उपलब्ध होणार आहेत. ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला नाही, त्यांनी पहिला डोस घ्यावा. तसेच दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी ही लस उपलब्ध करून देण्यात येत आहे. नागिरकांनी लस घेऊन मनपाच्या आरोग्य केंद्रात येऊन लस घ्यावी, असे आवाहन गोरे यांनी केले आहे.
.......
गर्दी टाळा, मास्क वापरा
गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. घरोघरी गणरायाचे आगमन झाले असून, शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना ही परवानगी देण्यात आलेली आहे. नागरिकांनी गर्दी करू नये. नियमित मास्क वापरा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.