उद्यापासून जागर

By Admin | Updated: September 23, 2014 23:02 IST2014-09-23T22:57:46+5:302014-09-23T23:02:29+5:30

अहमदनगर: गुरूवारपासून शारदीय नवरात्रौत्सव सुरू होत असून देवी मंदिरातील तयारी पूर्ण झाली आहे. उत्सवानिमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

From tomorrow, Jagar | उद्यापासून जागर

उद्यापासून जागर

अहमदनगर: गुरूवारपासून शारदीय नवरात्रौत्सव सुरू होत असून देवी मंदिरातील तयारी पूर्ण झाली आहे. उत्सवानिमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उत्सव काळात मंदिरात देवीचा जगार सुरू होणार असून या काळात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नियोजनासाठी प्रशासनाचीही जय्यत तयारी झाली आहे.
पाणी तपासणीसाठी मनपाचे पथक
नवरात्रौत्सव काळात केडगाव व बुऱ्हाणनगर येथे भाविकांची मोठी गर्दी होणार असून आटोक्यात आलेले साथ रोग पसरू नये यासाठी महापालिकेने उपाययोजना आखल्या आहेत. त्यानुसार या ठिकाणच्या स्टॉलवरील पाण्याची तपासणी करण्याकरिता पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पिण्यास अयोग्य पाणी असणाऱ्या स्टॉलधारकांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
नवरात्र उत्सव काळात बुऱ्हाणनगर व केडगाव येथे देवी यात्रा असते. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. या ठिकाणी विविध खाद्य पदार्थाचे स्टॉल लावले जातात. नगर शहरात कावीळ साथीचा उद्रेक झाला होता. ही साथ आता आटोक्यात आली आहे. तिचा प्रसार पुन्हा होऊ नये यासाठी महापालिकेने दक्षता घेतली आहे. साथ पसरू नये यासाठी स्टॉलधारकांनी पिण्याचे पाणी क्लोरिनयुक्त असल्याची काळजी घ्यावी. पाणी पिण्यास योग्य की नाही याची तपासणी करण्याकरिता महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक, मदतनीस यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. हे पथक सकाळ, संध्याकाळ स्टॉलवरील पाण्याची तपासणी करणार आहेत. तपासणीत पाणी दूषित आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. भाविक नागरिकांनी, बालकांनी उघड्यावरील पदार्थ खाण्याचे टाळावे तसेच घरचेच पाणी पिण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
मेटल एम्बॉसिंगचे आकर्षक शिल्प
शहरातील भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयातील कलाशिक्षक प्रमोद रामदिन यांनी नवरात्रनिमित्त मेटल एम्बॉसिंगच्या माध्यमातून तुळजाभवानी मातेचे आकर्षक शिल्प साकारले आहे़ ३८ गेझ अ‍ॅल्युमिनियम पत्र्यावर लाकडी टुल्सच्या सहाय्याने उठाव देऊन तुळजाभवानी मातेचे २़५ बाय ३ फूट आकाराचे उठावशिल्प साकारले आहे़
अ‍ॅल्युमिनियम पत्र्यावर सुरुवातीस शाई नसलेल्या बॉलपेनद्वारे आऊटलाईन करून मागील बाजूने लाकडी ब्रश किंवा ट्रासद्वारे उठाव देवून एम्बॉस करणे व त्यानंतर बॉलपेननेच नक्षीकाम करून दागदागिन्यांची कलाकुसर करून रामदिन हे आकर्षक शिल्प साकारतात़ रामदिन यांनी या पद्धतीने अनेक कलाकृती साकारल्या आहेत़ रामदिन यांनी फिरोदिया विद्यालयात आर्ट गॅलरी तयार केली आहे़ विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांची माहिती व्हावी, यासाठी ३ बाय ४ फूट आकारात ४० चित्रे एम्बॉसिंग या प्रकारात साकारली आहेत़ यापूर्वी रामदिन यांनी तिरुपती बालाजी, आनंदऋषी महाराज, मेहेरबाबा, अहिल्याबाई होळकर, कोल्हापूरची महालक्ष्मी, साईबाबांची विविध रुपे, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प तयार केले आहेत़
केडगावात जय्यत तयारी
नगरकरांचे श्रध्दास्थान असलेल्या केडगाव येथील रेणुकामाता मंदिरात घटस्थापनेची जय्यत तयारी करण्यात आली असून, नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे़ मंदिर परिसरात साफसफाई, रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे़ गुुरुवारी सकाळी साडेआठ वाजता मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे़ भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत़ मंदिर परिसरातील जुने लिंबाचे झाड व ओटा काढल्यामुळे मंदिर परिसर अजून प्रशस्त झाला आहे़
शहरातील गौरीशंकर मित्रमंडळाच्यावतीने हनुमान चालिसा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, नृत्य स्पर्धा, संगीत खुर्ची, आरती थाळी स्पर्धा, पाककला आदी स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे़ प्रेमदान हडको येथील बेलेश्वर मित्रमंडळाच्या वतीनेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ नृत्य, होममिनिस्टर, दांडिया व रांगोळी स्पर्धा होणार आहेत़

Web Title: From tomorrow, Jagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.