आज शाळांची ‘पहिली घंटा’
By Admin | Updated: June 14, 2016 23:19 IST2016-06-14T23:13:11+5:302016-06-14T23:19:56+5:30
अहमदनगर : यंदाच्या शैक्षणिक वर्षाला बुधवार, दि. १५ जूनपासून सुरुवात होत आहे. आजपासून माध्यमिक आणि प्राथमिक शाळा सुरू होणार

आज शाळांची ‘पहिली घंटा’
अहमदनगर : यंदाच्या शैक्षणिक वर्षाला बुधवार, दि. १५ जूनपासून सुरुवात होत आहे. आजपासून माध्यमिक आणि प्राथमिक शाळा सुरू होणार असून शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात येणार आहे. प्राथमिक शाळांमध्ये कन्या प्रवेश उपक्रम राबवण्यात येणार असून अधिकारी वर्ग जिल्हाभर शाळांना भेटी देवून जास्तीत जास्त शाळाबाह्यांना शाळेत प्रवेशासाठी प्रयत्न करणार आहेत.
आज शाळांची पहिली घंटा वाजणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभासोबत त्यांच्यासाठी मिष्टान्न देण्याची व्यवस्था करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. शंभर टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली असून गणेवशाची रक्कम तालुकानिहाय बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात गेल्या शैक्षणिक वर्षात ५०० हून अधिक शाळांना ‘आयएसओ’ मानांकन मिळाले असून प्राथमिक शाळेतील शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या उपस्थितीत पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांची पाथर्डी तालुक्यातील शाळा, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड या कर्जत तालुक्यातील शाळांमध्ये, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार हे राहाता तालुक्यातील शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव साजरा करणार आहेत.
जिल्हा परिषद शाळांतील १ लाख २० हजार मुली, अनुसूचित जातीचे विद्यार्थी १८ हजार ९१, अनुसूचित जमातीचे मुले १९ हजार ६००, दारिद्रय रेषेखालील १० हजार ६९२ विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानातून गणवेश देण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख ते विस्तार अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना शाळाभेटी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या भेटी दरम्यान, त्यांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश, विशेषकरून शाळाबाह्य विद्यार्थी यांचा प्रवेश यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
(प्रतिनिधी)