शहर बसचा आज निर्णय
By Admin | Updated: July 5, 2014 00:29 IST2014-07-04T23:16:23+5:302014-07-05T00:29:56+5:30
अहमदनगर: शहर बससेवा चालविणाऱ्या अभिकर्ता संस्थेची मागणी पूर्ण करून सेवा पूर्ववत होणार की नवीन अभिकर्ता संस्था नियुक्त करणार याचा निर्णय शनिवारी होणाऱ्या महासभेत होणार आहे.
शहर बसचा आज निर्णय
अहमदनगर: शहर बससेवा चालविणाऱ्या अभिकर्ता संस्थेची मागणी पूर्ण करून सेवा पूर्ववत होणार की नवीन अभिकर्ता संस्था नियुक्त करणार याचा निर्णय शनिवारी होणाऱ्या महासभेत होणार आहे. सत्ताधाऱ्यांनी अनुकूलता दर्शविली असली तरी अभिकर्ता संस्थेने मात्र नकार घंटा वाजविली आहे. महापालिकेच्या नोटीसचा खुलासा देताना संस्थेने महापालिकेच्या कारभाराच्या केलेल्या पंचनाम्याचे पडसाद सभेत उमटण्याची चिन्हे आहेत.
प्रसन्ना पर्पल या अभिकर्ता संस्थेने नुकसान भरपाई सात लाख रुपये प्रतिमहिना व आठ बसेस इतरत्र हलविण्याची केलेली मागणी स्थायी समितीने फेटाळल्यानंतर १८ जूनपासून बससेवा बंद करण्याचा निर्णय अभिकर्ता संस्थेने घेतला. त्यानंतर महापालिकेने करारनामा भंग झाला म्हणून दंड आकारण्याची नोटीस पाठविली. त्याला संस्थेने सडेतोड उत्तर दिले. त्यात महापालिकेच्या असहकार्यामुळेच सेवा बंद पडली. महापालिकेने दिलेल्या अश्वासनाची पूर्तता केली नाही. शहरातील रस्ते चांगले नाहीत. त्यामुळे इंधन जादा लागते. यासह अन्य कारणे देत महापालिकेच्या कारभाराचा पंचनामा केला. दरम्यान सत्ताधारी पक्षानेही अभिकर्ता संस्थेशी चर्चा केली. पण संस्था बससेवा सुरू करण्यास असमर्थ असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी नवीन अभिकर्ता संस्था शोधण्याचे प्रयत्न सुरू केले त्याला यश मिळाले. तीन संस्था सेवा सुरू करण्यास पुढे आल्या आहेत. जुन्या प्रसन्ना अभिकर्ता संस्थेवर काय कारवाई करायची, की त्याची मागणी पूर्ण करून सेवा सुरू करायची. अथवा नवीन संस्था नियुक्त करण्याचा निर्णय घ्यायचा याचा निर्णय महासभेत होणार आहे.
शहर बससेवा सुरू व्हावी अशी मागणी सत्ताधारी, विरोधी नगरसेवक व नागरिकांनी केली आहे. ही गरज ओळखून महासभेत हा विषय घेण्याचा निर्णय महापौर संग्राम जगताप यांनी घेतला.
जगताप हे बससेवेसाठी सकारात्मक असले तरी सभागृह विषय कशा पध्दतीने हाताळते यावर शहर बससेवेचे भवितव्य ठरणार आहे. (प्रतिनिधी)