भिंगार : भिंगार शहरात रविवारी गणेश मंडळांनी देखावे खुले केल्याने नागरिकांनी गर्दी केली होती़ धार्मिक, सामाजिक, पौराणिक विषयांसह प्रबोधनात्मक संदेश देणारे देखावे यंदा सादर करण्यात आले आहेत़ येथील सार्वजनिक मंडळाच्यावतीने लाडक्या गणरायाला मंगळवारी निरोप देण्यात येणार आहे़ दुपारी पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांच्या हस्ते मानाच्या देशमुख गणपतीची आरती झाल्यावर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.शहरात गेली सात ते आठ दिवस गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ लोहार गल्लीतील आझाद तरुण मंडळाने कर्जबाजारी शेतकरी व शालेय विद्यार्थ्यांनी आत्महत्या करू नये हा समाज प्रबोधन करणारा देखावा सादर केला. तर माळगल्लीतील समता मित्र मंडळाने पर्यावरणावर आधारित वृक्ष रोपणावर नंदी बैलाला सांग सांग भोलेनाथ यंदा पाऊस पडेल का..? हलता देखावा सादर करत पर्यावरणाचे संतुलन राखा हा संदेश दिला. गवळी वाड्यातील सम्राट मित्र मंडळाने गणेश विसर्जन मिरवणूक देखावा सादर केला. तसेच राम भक्त हनुमान, शिर्डी साई बाबांची दीपावली, श्रीकृष्णाकडून कंसाचा वध, या विषयांवर अन्य मंडळांनी देखावे सादर केले. तर वाघस्कर गल्लीतील शुक्लेश्वर तरुण मंडळाने दहा फुट भव्य गणेश मूर्तीसमोर आकर्षक विद्दुत रोषणाई करत सर्वांचे लक्ष वेधले होते.(वार्ताहर)
भिंगारमध्ये गणरायांना आज निरोप
By admin | Updated: September 12, 2016 23:11 IST