अहमदनगर : ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या अहमदनगर आवृत्तीचा ३४ वा वर्धापन दिन स्वातंत्र्यदिनी साजरा होत आहे. यानिमित्त यावर्षी ‘ज्ञानदीप लावू जगी’ हा नगर जिल्ह्यातील संत परंपरेचा समृद्ध वारसा सांगणारा विशेषांक वाचकांच्या भेटीला येत आहे.
‘लोकमत’ची अहमदनगर आवृत्ती १५ ऑगस्ट १९८७ साली सुरू झाली. परखड व वस्तुनिष्ठ पत्रकारितेमुळे ‘लोकमत’ राज्यासह जिल्ह्यातील आघाडीचे वृत्तपत्र बनले. नगर जिल्ह्यातील अनेक सामाजिक प्रश्न तडीस नेत ‘लोकमत’ने वाचकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. वर्धापन दिनानिमित्त दर्जेदार विशेषांक प्रकाशित करण्याची परंपरा ‘लोकमत’ने निर्माण केली आहे. नगर जिल्ह्यातील शहिदांना वंदन करणारा ‘शूरा आम्ही वंदिले, ‘वारसा’, ‘भूमिपुत्र’, कोरोना योद्ध्यांना सलाम करणारा ‘लढेंगे-जितेंगे’ या विशेषांकांना वाचकांनी यापूर्वी पसंती दिली आहे.
यावर्षी ‘ज्ञानदीप लावू जगी’ व ‘ऋतू हिरवा’ हे विशेषांक प्रकाशित होत आहेत. रविवारपासून नियमित अंकासोबत हे विशेषांक वाचकांच्या हाती पडतील. वर्धापन दिनानिमित्त ‘लोकमत’ भवनमध्ये दरवर्षी वाचकांचा स्नेहमेळावा होत असतो. मात्र, कोरोना महामारीमुळे खबरदारी म्हणून यावर्षी हा मेळावा रद्द करण्यात आला आहे.