थकीत पगाराचा प्रश्न निकाली
By Admin | Updated: July 13, 2016 00:35 IST2016-07-13T00:09:53+5:302016-07-13T00:35:57+5:30
नेवासा : तीन ते चार महिन्यांचा थकीत पगार त्वरित मिळावा, या प्रमुख मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून सुरू केलेले धरणे आंदोलन

थकीत पगाराचा प्रश्न निकाली
नेवासा : तीन ते चार महिन्यांचा थकीत पगार त्वरित मिळावा, या प्रमुख मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून सुरू केलेले धरणे आंदोलन मंगळवारी प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यानंतर बारा दिवसात थकीत पगार एकरकमी केले जातील, असे आश्वासन प्रशासनाकडून मिळाल्यानंतर स्थगित करण्यात आले.
नेवाशाचे तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी या आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी प्रशासक म्हणून पदभार घेणारे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल इंगळे हजर होते.
धरणे आंदोलनाचे नेतृत्व करणारे समर्पण फाऊंडेशनच्या मजदूर संघाचे प्रमुख डॉ. करणसिंह घुले यांनी आंदोलनामागील भूमिका विशद केली. तीन ते चार महिन्याचा पगार नसल्याने सफाई, पाणी पुरवठा, झाड़ू कामगारांवर कशी उपासमारीची वेळ आली, हे तहसीलदार व प्रशासकांच्या निदर्शनास आणून दिले. माजी सरपंच नंदकुमार पाटील, सतीश गायके, ‘समर्पण’चे प्रवक्ते सुधीर चव्हाण यांनी चर्चेत भाग घेऊन यातून लवकरात लवकर निर्णय व्हावा, अशी आग्रही भूमिका घेतली.
प्रशासक म्हणून काम पाहताना आपण चांगली भूमिका बजावी. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी वसुलीवर भर द्यावा, असे आवाहन प्रशासक म्हणून काम पाहणारे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल इंगळे यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके, राजेंद्र मापारी, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे उत्तमराव वाघमारे, प्रताप कडपे, राजेश्वर सोनवणे, राजेंद्र चव्हाण, बंडू चक्रनारायण, विश्वास वाघमारे तसेच कर्मचारी हजर होते. नगरपंचायतमधील कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला होता.
(तालुका प्रतिनिधी)