‘तेल्या’मुळे डाळिंब बागांवर जेसीबी फिरविण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:09 IST2021-08-02T04:09:18+5:302021-08-02T04:09:18+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील जवळपास तीन हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र तेल्या रोगाच्या कचाट्यात सापडले आहे. त्यामुळे जेसीबी घालून डाळिंब ...

‘तेल्या’मुळे डाळिंब बागांवर जेसीबी फिरविण्याची वेळ
केडगाव : नगर तालुक्यातील जवळपास तीन हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र तेल्या रोगाच्या कचाट्यात सापडले आहे. त्यामुळे जेसीबी घालून डाळिंब बागा नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
तालुक्यात जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड झालेली आहे. बाजारी मागणी चांगली असल्याने दुष्काळी भागातील शेतकरी मोठा आर्थिक भार सोसत डाळिंब लागवडीकडे वळला. अरणगाव, खडकी, खंडाळा, वाळकी, पिंपळगाव लांडगा, पिंपळगाव उज्जैनी, शेंडी, पोखर्डी या भागात डाळिंब अधिक आहे. डाळिंब फळांना मिळणारा बाजारभाव आर्थिकदृष्ट्या परवडणारा असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक धाडस करीत डाळिंब पिकांची लागवड केली. यातून तालुक्यात डाळिंब बाग लागवड तीन हजार हेक्टरपर्यंत पोहोचली.
मात्र, सध्याच्या विपरीत हवामान व वातावरणाचा परिणाम या डाळिंब फळबागांवर होत आहे. यातून तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे फळांच्या उत्पादनावर थेट विपरीत परिणाम होत असल्याने तालुक्यातील जवळपास ८o टक्के डाळिंबांचे क्षेत्र जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
वातावरणातील अतिआर्द्रता व रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचे जाणकार शेतकरी सांगतात. सततच्या रासायनिक खतांच्या डोसामुळे बागामधील उष्णतेचे प्रमाण वाढते. यामुळे बागांवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिकच वाढला आहे. यातून काही अरणगाव, खडकी, खंडाळा यांसारख्या गावातील शेतकऱ्यांनी वेळीच या रोगावर उपाययोजना सुरू केल्या. त्यामुळे या भागातील काही डाळिंब फळबागा तग धरून आहेत.
----
काय आहेत तेल्याची लक्षणे..
डाळिंब बागांवर तेल्या रोगामुळे पानावर ठिपका पडतो. फळांवर हिरव्या रंगाचा डाग येतो. या रोगाचा हल्ला वाढत जाऊन फळे लवकर फुटतात. त्यातून तेलकट द्रव पदार्थ बाहेर पडतो. यामुळे फळांचे उत्पादन कमालीचे घटते. फळे खराब निघतात.
-----
काय घ्यावी खबरदारी
डाळिंब पिकांवर रासायनिक खतांचा व औषधांचा वापर कमी करावा. जैविक खते, गांडूळ खते, शेण खत, शेंगदाणा खत यांचा वापर करावा. यामुळे वातावरणात आर्द्रता वाढते. तरी पिकांवरील उष्णतेचे प्रमाण कमी राहते. वातावरण पाहून रासायनिक खतांच्या मर्यादित स्वरूपात वापराचा निर्णय घ्यावा.
----
माझे पोखर्डीत डाळिबांची अडीच हजार झाडे होती. मात्र, तेल्या रोगामुळे ही सर्व झाडे काढून टाकली. आता अरणगावमध्ये चार हजार डाळिंबाची लागवड केली आहे. रासायनिक खते कमी करून जैविक खतांचा वापर सुरू केल्याने डाळिंब बाग तग धरून आहे.
- अक्षय कराळे,
डाळिंब उत्पादक, पोखर्डी
----
०१ डाळिंब, १