प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नशिबी घाणीत उपोषणाची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST2021-09-02T04:45:24+5:302021-09-02T04:45:24+5:30

देवळाली प्रवरा : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामागील घाणीच्या साम्राज्यात आमरण उपोषण ...

The time of fasting in the fate of project affected farmers | प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नशिबी घाणीत उपोषणाची वेळ

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नशिबी घाणीत उपोषणाची वेळ

देवळाली प्रवरा : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामागील घाणीच्या साम्राज्यात आमरण उपोषण करण्याची वेळ आली. विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्त कृती समितीला अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाने घाणीच्या साम्राज्यात आमरण उपोषण करण्यासाठी जागा दिली आहे. त्यामुळे विद्यापीठ उभारणीसाठी जमिनी देऊनही शेतकऱ्यांच्या नशिबी घाणीत उपोषण करण्याची वेळ आली. त्यामुळे प्रशासनाच्या विरोेधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

घाणीच्या साम्राज्यात उभे करून, आम्ही कधीही न केलेल्या चुकीची शिक्षा आम्हाला देऊ नका. सन्मानाने आमचे हक्क मागण्याचा अधिकार आमच्यापासून हिरावून घेऊ नका, अशी हाक प्रकल्पग्रस्त देत आहेत. शासन निर्णयातील तरतुदीनुसार नोकरीत सामावून घेता येत नसेल, तर आमच्या जमिनी आम्हाला परत करा, म्हणजे आमच्या उदरनिर्वाहाची सोय होईल, असे शेतकरी सांगत आहेत. राहुरी तालुक्यातील सहा गावांतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विद्यापीठ सेवेत प्रशासनाने सामावून घेण्यासाठी हा लढा सुरू केला आहे. १९६८ साली विद्यापीठ स्थापन झाले. त्यावेळी ५८४ शेतकऱ्यांच्या २८४९.८८ हेक्टर जमिनीचे संपादन झाले. कुटुंबातील व्यक्तीला विद्यापीठ सेवेत घेण्याबाबत शासन तरतूद असतानाही विद्यापीठ प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना डावलले जात आहे. १ जून, २०२१ पर्यंत मंजूर पदापैकी गट क व गट ड संवर्गातील १,३१४ पदे रिक्त आहेत. २००८ पर्यंत व २००९ मध्ये विद्यापीठाने ३९४ प्रकल्पग्रस्त उमेदवारांना विद्यापीठ सेवेत सामावून घेतले आहे. उर्वरित प्रकल्पग्रस्त यांना विद्यापीठ सेवेत सामावून घेण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने लोकशाही मार्गाने उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

.................

सहा गावांतील प्रकल्पग्रस्त

राहुरी तालुक्यातील खडांबे, सडे, वरवंडी, राहुरी खुर्द, पिंप्री अवघड, डिग्रस या सहा गावातील शेतकऱ्यांचा प्रकल्पग्रस्तांमध्ये समावेश आहे. शेतकऱ्यांमध्ये आंदोलनाबाबत भावना तीव्र होत आहे. ३० ऑगस्टपासून अमरण उपोषण सुरू केले आहे. प्रकल्पातील बाधित व्यक्तीला त्याच प्रकल्पात गट क व गट डमध्ये सामावून घेताना ५० टक्के जागेवर सामावून घेण्याचे स्पष्ट तरतूद असतानाही विद्यापीठाने स्थानिक प्रकल्पग्रस्तांना दर वेळी डावलले आहे. विद्यापीठात ४५ टक्क्यांपर्यंत रिक्त जागा आहेत. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय नाही. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विद्यापीठ सेवेत सामावून घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. या आंदोलनात कृती समितीचे अध्यक्ष संतोष पानसंबळ, उपाध्यक्ष विजय शेडगे, राहुल शेटे, श्रीकांत बाचकर, सम्राट लांडगे सहभागी झाले आहेत.

०१ राहुरी

Web Title: The time of fasting in the fate of project affected farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.