केंद्र सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ : बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 13:26 IST2021-03-26T13:25:55+5:302021-03-26T13:26:01+5:30
केंद्रातील भाजप सरकार हे केवळ नफेखोरीसाठी काम करत आहे. पेट्रोलवर भरमसाठ कर लादून सर्वसामान्य जनतेला ते वेठीस धरत आहे.

केंद्र सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ : बाळासाहेब थोरात
श्रीरामपूर : केंद्रातील भाजप सरकार हे केवळ नफेखोरीसाठी काम करत आहे. पेट्रोलवर भरमसाठ कर लादून सर्वसामान्य जनतेला ते वेठीस धरत आहे. त्यामुळे या सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ आली आहे असा इशारा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.
दिल्लीतील शेतकरी आंदोलकांनी दिलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी येथील प्रशासकीय इमारतीसमोर आयोजित धरणे आंदोलनात मंत्री थोरात बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, ज्ञानदेव वाफारे, सचिन गुजर, अंकुश कानडे, अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, वंदना मुरकुटे, इंद्रनाथ थोरात आदी यावेळी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, मोदी सरकार हे केवळ भांडवलदार आणि नफेखोरांसाठी काम करत आहे. तीन कृषी कायदे हे नफेखोरीसाठी साठेबाजी करायला वाव देणारे आहेत. त्यामुळे पंजाब राज्यात मोठमोठी गोदामे बांधण्यात आली आहेत. या काळ्या कायद्यांमुळे शहरातील नागरिकांना महागात शेतमाल खरेदी करावा लागेल.
दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे ऐतिहासिक ठरले आहे. जगभर त्याची दखल घेतली गेली आहे. मात्र पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांना सामोरे जाण्यास तयार नाहीत. शेतकऱ्यांना ऐकून घेण्याची त्यांची मानसिकता नाही. त्यामुळे या सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ आली आहे.