तीन हजार आशा सेविका फत्ते करताहेत जंतनाशक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:39 IST2021-03-04T04:39:11+5:302021-03-04T04:39:11+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम सुरू झाली असून, जिल्ह्यातील एकूण ११ लाख ...

तीन हजार आशा सेविका फत्ते करताहेत जंतनाशक मोहीम
अहमदनगर : जिल्ह्यात १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम सुरू झाली असून, जिल्ह्यातील एकूण ११ लाख ७६ हजार लाभार्थ्यांना या गोळ्या वाटप होत आहेत. तीन हजार २०० आशासेविका ही मोहीम फत्ते करत आहेत. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त १ मार्च रोजी बहुतांश गोळ्यांचे वाटप झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांना ८ मार्चपर्यंत गोळ्या वाटप होणार आहेत.
ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्रामध्ये एकूण ५६७९ अंगणवाडी केंद्रांमधून २ लाख ९६ हजार ९५ लाभार्थ्यांना, तसेच ५ हजार १७८ शासकीय, अनुदानित व खासगी शाळांमधून ८ लाख ८० हजार १८४ शालेय विद्यार्थ्यांना असे एकूण ११ लाख ७६ हजार २७९ लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. त्याकरिता राज्यस्तरावरून २१ लाख ३७ हजार जंतनाशक गोळ्या जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या आहेत.
भारतात ६ ते ५९ महिन्यांच्या वयोगटातील प्रत्येक १० बालकांमागे ७ बालकांमध्ये रक्तक्षय आढळतो. ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक असू शकते. तसेच १५ ते १९ वर्षे वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो.
राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा उद्देश १ ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना अंगणवाडी, शाळा या ठिकाणी जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, तसेच पोषणस्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे आहे. मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, नगरपालिका दवाखाने व महानगर पालिका येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
१ मार्च रोजी बहुतांश मुलांना गोळ्या देण्यात आल्या. जर लाभार्थी त्या दिवशी आजारी किंवा त्यांना इतर कारणामुळे गोळी घेणे शक्य झाले नाही, त्यांना ८ मार्च रोजी शाळा व अंगणवाडी केंद्रामध्ये गोळी देण्यात येणार आहे.
---------------
जेथील शाळा सुरू आहेत, तेथे पहिली ते बारावीपर्यंतच्या मुला-मुलींना या गोळ्या देण्यात आल्या आहेत. परंतु कोविडमुळे जर काही विद्यार्थी शाळेत येऊ शकले नाही, तर त्यांना आशासेविका घरपोहोच गोळ्या देणार आहेत.
- डाॅ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी
------------
जंतनाशक गोळ्यांचे लाभार्थी
०१ ते ०६ वर्षे - २ लाख ९६ हजार ९५२
०७ ते १९ वर्षे - ८ लाख ८० हजार १८४
------------
तीन हजार कर्मचाऱ्यांची फौज
जिल्ह्यात या गोळ्या वाटप करण्यासाठी तीन हजार २०० आशासेविका कार्यरत आहेत. कोरोनामुळे ज्या शाळा किंवा अंगणवाडी बंद आहेत, अशा ठिकाणी हे कर्मचारी घरोघरी जाऊन गोळ्या देणार आहेत. कोरोनाच्या काळात या कर्मचाऱ्यांनी आधीही घरोघरी जाऊन काम केलेले आहे. त्यामुळे हे काम करताना त्यांना कोरोनाचा अडसर होणार नाही, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
---------
फोटो - ०३टॅबलेट डमी १,२,३,