तिघे दरोडेखोर गजाआड
By Admin | Updated: September 3, 2014 23:58 IST2014-09-03T23:57:09+5:302014-09-03T23:58:54+5:30
अहमदनगर : सारोळा कासार ते बाबुर्डी बेंद शिवारातील डोंगराच्या पायथ्याला आडोशा घेऊन बसलेली तीन जणांची टोळी नगर तालुका पोलिसांनी गजाआड केली आहे.

तिघे दरोडेखोर गजाआड
अहमदनगर : सारोळा कासार ते बाबुर्डी बेंद शिवारातील डोंगराच्या पायथ्याला आडोशा घेऊन बसलेली तीन जणांची टोळी नगर तालुका पोलिसांनी गजाआड केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.एस. तोडकर यांनी दिले आहेत.
मंगळवारी (दि.३) पहाटेच्या सुमारास पोलिसांची गस्त सुरू असताना त्यांना डोंगराच्या पायथ्याशी काही इसम बसलेले दिसले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे तलवार, चाकू, कुऱ्हाड,सत्तुर, लाकडी दांडके असे साहित्य मिळाले. ते दरोड्याच्या तयारीत असल्याची कबुलीही चोरट्यांनी दिली. पाच जणांच्या या टोळीतील तिघांना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले. राहुल नेवाश्या भोसले (वय २१), गोरख चलाश्या भोसले (वय २१, दोघे रा. सारोळा कासार, ता.नगर), अवटर याकूब चव्हाण (रा. अनकुटे, ता. येवला) या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांना ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.
यातील खलनायक उर्फ खल्या करामत काळे (रा. राजुरा, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) आणि राहुल्या चलाश्या भोसले (रा. सारोळा कासार) हे तिघे फरार आहेत. नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शंकर नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल आनंद सत्रे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस यांच्या पथकाने ही कारवाई केली. आनंद सत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)