कोरोना झालेल्या तीन टक्के रुग्णांना रक्तदाब, मधुमेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:15 IST2021-07-19T04:15:16+5:302021-07-19T04:15:16+5:30
----------------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोना होऊन गेलेल्या १०० पैकी ३ रुग्णांना मधुमेह, रक्तदाबाचा विकार झालेला आहे, असे ...

कोरोना झालेल्या तीन टक्के रुग्णांना रक्तदाब, मधुमेह
-----------------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोना होऊन गेलेल्या १०० पैकी ३ रुग्णांना मधुमेह, रक्तदाबाचा विकार झालेला आहे, असे खासगी डॉक्टरांनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. कोरोनाचा तीव्र त्रास झालेल्या काही रुग्णांची फुफ्फुसाची कार्यक्षमता घटल्याचेही दिसून आले आहे.
कोरोनाशी दोन हात करून अनेकांनी या आजारावर मात केली. मात्र, फुफ्फुसाच्या काही भागात ‘फायब्रोसिस’ झाल्याचे दिसते. काही रुग्णांना ऑक्सिजनवर दिवस काढावे लागत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक भयावह ठरली. पहिल्या लाटेत ७५ हजार तर दुसऱ्या लाटेत २ लाख १० हजारांपेक्षा जास्त रुग्ण बाधित आढळले. जवळपास सहा हजार जणांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासकीय व खासगी रुग्णालयात बेड मिळत नव्हते. अशा कठीण परिस्थितीत ज्या रुग्णांना बेड मिळाले व कोरोनातून बरे झाले ते फुफ्फुसाच्या आजाराने आजही ऑक्सिजन थेरपीवर दिवस काढत आहेत. असे रुग्ण कमी प्रमाणात आहेत; मात्र तीन टक्के रुग्णांना मधुमेह, रक्तदाब होतो, असे तज्ज्ञ सांगत आहेत.
--------------
कोरोनातून बरा..श्वसनाचा त्रास
कोरोनामुक्त झाल्यानंतरही फुफ्फुसावरचे व्रण कायम असतात. त्यामुळे त्रास होतो.
कोरोनातून बाहेर आलेल्यांना किमान एक महिना तरी शारीरिक हालचाली करताना दम लागतो.
मोठ्या प्रमाणात अशक्तपणा येऊन खोकल्याचा त्रासही जाणवतो. त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा.
-------
पोस्ट कोविडचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांना
कोरोना विषाणू संसर्गाचा धोका हा ज्येष्ठांना सर्वाधिक असल्याचे पहिल्या व दुसऱ्या लाटेतून पुढे आले आहे. मृत्यूदरामध्ये वयोवृद्धांचेच प्रमाण सर्वाधिक होते. त्यातही इतर दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना कोरोना विषाणूने सर्वाधिक प्रमाणात पछाडले. ही आकडेवारी या दोन्ही लाटेतून दिसून आली.
---------
बरे झाल्यानंतरही ही घ्या काळजी
कोरोना झालेल्यांनी संतुलित आहार घेऊन शरीराची झीज भरून काढणे गरजेचे आहे.
फुफ्फुसातून न्यूमोनिया असल्यास ऑक्सिजन लागतो. वाफारा घ्यावा. चेस्ट फिजिओथेरपी घ्यावी.
कोविडमधून बाहेर आल्यानंतर किमान एक महिनाभर शारीरिक काम करणे टाळावे.
----------
जिल्ह्यात कोरोना झाल्यानंतरही काही रुग्णांना मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होतो. त्याचे प्रमाण जिल्ह्यात ३ टक्के आहे. व्यायाम, आहार आणि विश्रांतीबाबत कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपली दिनचर्या ठरवावी. यामुळे धोके कमी होतील.
-डॉ. सचिन वहाडणे, सचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन
-----------