तीन जणांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली
By Admin | Updated: July 21, 2016 23:54 IST2016-07-21T23:49:44+5:302016-07-21T23:54:56+5:30
शिर्डी/ बेलापूर : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली़ त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही़

तीन जणांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली
शिर्डी/ बेलापूर : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली़ त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही़ तर शिर्डीत वडीलांनी घेतलेले कर्ज फेडू शकत नाही, म्हणून मुलाने गळफास घेतला़ या शिवाय आजारपणाला कंटाळलेल्या सतरा वर्षीय युवतीनेही गळ्याभोवती फास आवळला़
शिर्डीतील पुनम देवानंद शेजवळ (वय १७) ही गेल्या काही वर्षांपासून पायाला झालेला जळवात व इसबगुल या आजाराला कंटाळली होती़ माजी नगरसेवक व संस्थानचे कर्मचारी देवानंद शेजवळ यांची ती मुलगी होती़ तिने बुधवारी मध्यरात्री नंतर तिच्या खोलीतच गळफास घेवुन आत्महत्या केली़
सकाळी रूममधून पुनम बाहेर येत नाही, दरवाजा ठोठावला तरीही आतमधून कोणताही प्रतिसाद कुुटुंबीयांना मिळाला नाही म्हणून दुसऱ्या किल्लीने दरवाजा उघडला असता तिने गळफास घेतल्याचे उघड झाले़ तिच्या अकाली मृत्युने आई, वडील, लहान भाऊ, आजी व नातलगांना मानसिक धक्का बसला आहे़
शिर्डीतच दुसरी गळफास घेतल्याची घटना घडली़ भीमनगर येथे अमोल संघपाळ शेजवळ (वय २४) याचे सनी किराणा व जनरल स्टोअर्स हे दुकान आहे़ अमोलने व्यवसायासाठी कर्ज घेतले होते़ कुटुंबाची जबाबदारी अमोलवर होती. पर्यायाने कर्जाचा बोजा वाढत राहिला.
पहाटे पाच पासून रात्री अकरा पर्यंत किराणा दुकान अमोल सांभाळत असे़ पाठची बहिण हुशार होती. बहिणीला पैशाअभावी बीएएमएसला प्रवेश घेता आला नव्हता ही खंतही त्याला होती़ यातच कर्ज फेडणे शक्य नसल्याने अमोलने आपल्या किराणा दुकानातच गळफास घेवुन आत्महत्या केली़ त्याचा दोन वर्षापुर्वीच विवाह झाला होता़ त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहीण असा परिवार आहे़ वरील दोन्ही घटनेबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील तरुण शेतकरी गणेश अनिल बडाख (वय २९) याने (चांदेगाव ता.राहुरी) येथे स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही.
मयत गणेश यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, वडील, चुलत भाऊ असा परिवार आहे. राहुरी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करुन शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. बेलापूर येथे सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
(प्रतिनिधी)