संगमनेर : गावठी कट्टा, ३४ जिवंत काडतुसे आणि एका चारचाकी वाहनासह पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तिघांना संगमनेर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) पहाटे संगमनेरातील नाशिक-पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाका येथे करण्यात आली. दिलीप कोंडीबा खाडे (वय २८, रा. म्हस्के बुद्रूक, ता.शिरूर, जि.पुणे), बाबाजी बबन मुंजाळ (वय २७, रा. डोंगरगाव, ता.शिरूर, जिल्हा. पुणे), दयानंद मारूती तेलंग (वय ३३, रा. टाकळीहाजी, ता.शिरूर, जि. पुणे) अशी या तिघांनी नावे आहेत. रायतेवाडी शिवारापासून पाठलाग करीत नाशिक-पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ या तिघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून गावठी कट्टा, ३४ जिवंत काडतुसे, मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तसेच ते प्रवास करीत असलेले चारचाकी वाहन ताब्यात घेतले आहे. गेल्या आठवड्यात संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे सराफ व्यावसायिकावर गोळीबार झाला होता. त्यानंतरच पुन्हा एकदा गावठी कट्टा आणि ३४ जिवंत काडतुसे कोठून आणि कशासाठी आणली? याचा तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहेत.
गावठी कट्टा बाळगणा-या तिघांना अटक; ३५ जिवंत काडतुसे, जीप जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 13:46 IST