रेमडेसिविरचा काळाबाजार करणारे तिघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:10 IST2021-05-04T04:10:29+5:302021-05-04T04:10:29+5:30
हेमंत दत्तात्रय कोहक (रा.बोल्हेगाव), भागवत मधुकर बुधवंत (रा. आदर्श कॉलनी, बोल्हेगाव) आणि आदित्य बाबासाहेब म्हस्के (रा. माताजीनगर, एमआयडीसी) अशी ...

रेमडेसिविरचा काळाबाजार करणारे तिघे जेरबंद
हेमंत दत्तात्रय कोहक (रा.बोल्हेगाव), भागवत मधुकर बुधवंत (रा. आदर्श कॉलनी, बोल्हेगाव) आणि आदित्य बाबासाहेब म्हस्के (रा. माताजीनगर, एमआयडीसी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. २७ आणि ३२ हजार रुपयांना रेमडेसिविर इंजेक्शन ही टोळी विकत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील तारडे हॉस्पिटल परिसरात आणि बोल्हेगाव येथील काकासाहेब म्हस्के कॉलेज परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
दोघेजण अवैधरीत्या रेमडेसिविर इंजेक्शनचे विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी हेमंत कोहक याला शहरातील बालिकाश्रम रोडवरील तारडे हॉस्पिटलजवळून ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिफॉर्म कंपनीचे एक रेमडेसिविर इंजेक्शन, मोबाइल व स्कार्पिओ जीप असे एकूण सात लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कोहक याच्यासह त्याचे साथीदार महेश दशरथ मते, प्रदीप मारुती मगर व अमर शिंदे (रा. तिघे तागडवस्ती) यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या कारवाईत भगवान बुधवंत व आदित्य मस्के यांना ताब्यात घेतले असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात या दोघांसह अंकित कालिका मोर्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांकडून पोलिसांनी दोन रेमडेसिविर इंजेक्शन, एक मोबाइल जप्त केला. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.