सैराटची पुनरावृत्ती करण्याची मुलींना धमकी
By Admin | Updated: August 17, 2016 00:50 IST2016-08-17T00:38:33+5:302016-08-17T00:50:18+5:30
शेवगाव : स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर वरूर (ता. शेवगाव) येथील घरी परतणाऱ्या शाळकरी मुलीचा विनयभंग करून सैराटची पुनरावृत्ती करण्याची धमकी दिल्याप्रकरणी

सैराटची पुनरावृत्ती करण्याची मुलींना धमकी
शेवगाव : स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर वरूर (ता. शेवगाव) येथील घरी परतणाऱ्या शाळकरी मुलीचा विनयभंग करून सैराटची पुनरावृत्ती करण्याची धमकी दिल्याप्रकरणी राकेश विजू गरूड (वय २०, रा. वरूर) याच्यासह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला शेवगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. एक दिवस गाव बंद पाळून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. या घटनेमुळे वरूर गावात तणाव निर्माण झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून गावात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेवगावपासून पाच किलोमीटर अंतरावरील वरूर बुद्रूक येथील दोन शाळकरी विद्यार्थिनी सोमवारी शेवगाव येथे शाळेतील स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आटोपून ११ वाजेच्या सुमारास घरी वरूरला जाण्यासाठी निघाल्या होत्या. गावानजिकच्या ओढ्याच्या माथ्याजवळ या दोघींना मोटारसायकलवरुन आलेल्या दोन मुलांनी अडविले.
तुमचा मोबाईल नंबर द्या, नाही तर तुमचा सैराट करू, असे धमकावले. तसेच त्यांचा पाठलाग करून छेडछाड केली.
या घटनेमुळे भयभीत झालेल्या मुलींनी ही घटना आपल्या पालकांना सांगितली. ही घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर तणाव निर्माण झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी शेवगाव पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली.
एका मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राकेश गरूड व त्याच्या अल्पवयीन साथीदाराविरूद्ध भादंवि कलम ३४१, ३४२, ३५४ ड बालकांचे लैंगिक अपराधातून संरक्षण कलम १२ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. मंगळवारी वरूर गावात कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी दंगल नियंत्रण पथक तैनात केले आहे. प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे परिस्थितीवर लक्ष ठेवून असून शेवगाव पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहेत.
(तालुका प्रतिनिधी)