हजारे यांना धमकी
By Admin | Updated: January 16, 2016 23:09 IST2016-01-16T23:03:39+5:302016-01-16T23:09:14+5:30
पारनेर : तुम्ही तुमचा वारसदार ठरवा, अन्यथा तुम्हाला ठार मारू, अशा आशयाचे धमकीचे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नेवासा तालुक्यातून आले आहे.

हजारे यांना धमकी
पारनेर : तुम्ही तुमचा वारसदार ठरवा, अन्यथा तुम्हाला ठार मारू, अशा आशयाचे धमकीचे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नेवासा तालुक्यातून आले आहे. या पत्रात नेवासा तालुक्यातील तिघांची नावे व क्रमांक आहेत. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हजारे यांच्या कार्यालयात चार ते पाच दिवसापूर्वी पत्र आले असून पत्रातील एका पानावर अण्णा हजारे यांचा शेवटचा दिवस २६ जानेवारी असून ‘तुमचा आम्ही गेम करणार आहे. तुम्ही खूप मजा केली़ तुमचे वारसदार, मालमत्तेचे लवकर वितरण करा,’ असेही पत्रात म्हटले आहे. पत्रात नेवासा तालुक्यातील अंबादास चिमा लष्करे, निलेश ज्ञानेश्वर पोहेकर, पप्पू पवार, पांडे मिस्तरी, अमोल या नावाचा उल्लेख आहे. याबाबत शाम पठाडे, अमोल झेंडे यांनी पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पारेकर यांना माहिती दिली. त्यांनी याप्रकरणी फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला आहे. चार ते पाच दिवसापूर्वीच हा गुन्हा दाखल करताना केवळ प्रसिद्धीसाठी असे प्रकार होऊ नये म्हणून याबाबत गोपनीयता पाळण्यात आली होती. परंतु नंतर सोशल मीडियावर याची शनिवारी दिवसभर चर्चा झाल्याने हजारे यांच्या कार्यालयाने नंतर प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली. दरम्यान, पारनेर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून या पत्रात स्वत:ची नावे कोणी देणार नाही तर या चौघांच्या नावावर पत्र पाठविल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे़