विसापूर जलाशय नजीक तरी उद्योगनगरी तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:37 IST2021-03-13T04:37:26+5:302021-03-13T04:37:26+5:30

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीजवळ विसापूर जलाशयाचे पाणी असले तरी जुनी व विस्तारित उद्योगनगरी मात्र तहानलेलीच आहे. ‘धरण ...

Though near Visapur reservoir, the industrial city is thirsty | विसापूर जलाशय नजीक तरी उद्योगनगरी तहानलेलीच

विसापूर जलाशय नजीक तरी उद्योगनगरी तहानलेलीच

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीजवळ विसापूर जलाशयाचे पाणी असले तरी जुनी व विस्तारित उद्योगनगरी मात्र तहानलेलीच आहे. ‘धरण उशाला व कोरड घशाला’ अशी अवस्था निर्माण झाली आहे.

सध्या सुपा एमआयडीसीला मुळा जलाशय योजनेतून पाणी पुरवण्यात येत आहे. योजनेत होणाऱ्या बिघाडामुळे सातत्याने पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत आहे. त्यामुळे कारखानदार व प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. विसापूर जलाशय योजना राबवण्याची व जुन्या आणि नव्या विस्तारीत एमआयडीसीसाठी कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी कारखानदारांनी व त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष अनुराग धूत यांनी केली आहे.

सतत विस्कळीत होणाऱ्या पाणी पुरवठ्याने औद्योगिक वसाहतीच्या वाढीवर थेट परिणाम होणार असल्याने ५० ते ५५ किमी अंतरावरील जुनी झालेल्या मुळा जलाशय योजनेपेक्षा जवळच १० ते १२ किमी अंतरावर असणाऱ्या विसापूर जलाशयातून सुपा एमआयडीसीला पाणीपुरवठा केला तर तो फायदेशीर ठरणार आहे. टँकरच्या पाण्याचा कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया व उत्पादित मालाची गुणवत्ता यावरच थेट परिणाम होत असून विकत घ्याव्या लागणाऱ्या पाण्यावर अनाठायी खर्च करावा लागत असल्याचे धूत यांनी सांगितले.

जवळपास ५० ते ५५ किलोमीटर अंतरावरील मुळा जलाशयातून थेट सुप्याला कारखान्यासाठी लागणारे पाणी पुरविण्याची व्यवस्था केली आहे. तरी ही पाईपलाईन खूपच जुनी झाल्याने वारंवार त्यात होणाऱ्या बिघाडाने पाणीपुरवठा बंद होतो. परिणामी कारखान्यांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. ते पाणीही शुद्ध नसते. त्यामुळे त्याचा वापर केला तर उत्पादित मालाची गुणवत्ता ढासळते तर टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत असल्यानेही खर्च वाढतो असे विस्तारित एमआयडीसीत नव्याने सुरू झालेल्या मिंडा या कारखान्याचे व्यवस्थापक उल्हास नेवाळे व केएसपीजीचे व्यवस्थापक शिवाजीराव झनझने यांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यात निंबळक जवळ जलवाहिनी फुटली. त्यावेळी आठ दिवस पाणी बंद होते.

विस्तारित एमआयडीसीत जपानी पार्कची उभारणी होणार असून नव्याने बोक्सो व्हिया, वरूण बेव्हरेज यासारख्या नवीन कंपन्यांच्या कामास सुरवात होणार आहे. त्यामुळे नवीन उद्योजक सुविधांचा विचार करताना पाण्याच्या उपलब्धतेला प्राधान्य देत असल्याने जर पाण्याची सुविधा नसेल तर कारखाने येणार नाहीत. त्यामुळे शाश्वत पाण्यासाठी विसापूर जलाशय योजना हा चांगला पर्याय असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.

----

सुपा एमआयडीसीपासून विसापूर जलाशय अवघ्या १० ते १२ किलोमीटरवर आहे. तेथून सुपा एमआयडीसीसाठी पाणी उपलब्ध झाले तर कारखानदारांना पुरेसा व अखंडपणे पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यामुळे या योजनेबाबत आपण सरकारकडे आग्रह धरणार आहोत.

निलेश लंके,

आमदार, पारनेर-नगर

Web Title: Though near Visapur reservoir, the industrial city is thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.