मंत्री थोरात यांच्या हस्ते श्रीरामपुरातील यशोधनचे शुक्रवारी उद्घाटन झाले. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, काँग्रेस नेते ज्ञानदेव वाफारे, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, इंद्रनाथ थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे, अंकुश कानडे, सुधीर नवले, लकी सेठी, मल्लू शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी थोरात म्हणाले, गेली ३६ वर्षे आपण विधानसभेचे प्रतिनिधित्व करत आहोत. राजकीय कारकीर्दीच्या प्रारंभी अनेकदा तणाव येतो, जनतेच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकतो का, याविषयी चिंता वाटते. ती स्वाभाविक आहे. मात्र, हळूहळू प्रगल्भता येते.
आ. कानडे यांनी स्वतः संगमनेर येथे अनेकदा येऊन यशोधनमधील कामकाजाची पाहणी केली. बारीक-सारीक माहिती घेतली. त्यानंतर श्रीरामपूर येथे यशोधन सुरू केले. त्यामुळे यशोधनची ही नवी सुधारित आवृत्ती आहे. येथे आ. कानडे यांच्या कल्पकतेतून नवीन गोष्टींची भर पडेल, असे कौतुक मंत्री थोरात यांनी केले.
शासकीय योजनांसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, ती प्रमाणित करणे, संबंधित विभागाकडे त्याकरिता पाठपुरावा करणे ही सर्व कामे यशोधनमधून केली जाणार आहेत.
___
असे झाले ‘यशोधन’चे नामकरण
तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या हस्ते यशोधन या इमारतीचे संगमनेरला उद्घाटन झाले होते. मात्र, त्यावेळी इमारतीचे नामकरण निश्चित झालेले नव्हते. त्याप्रसंगी यशवंतराव चव्हाण यांचे विचार संकलन असलेले यशोधन हे पुस्तक हाती आले. त्यामुळे यशोधन हेच नाव इमारतीला देण्याचे सुचले. चव्हाण यांच्या यशाचे हे धन आहे, अशी आठवण मंत्री थोरात यांनी यावेळी सांगितली.
_____
ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना विविध शासकीय योजना कशा रीतीने राबवायच्या, यावर मी प्रशिक्षण देणार आहे. त्यातून गावातील नागरिकांना घरपोच योजनांचा लाभ दिला जाईल. कार्यकर्त्यांना विधायक कामाची त्यातून ऊर्जा मिळेल.
-आ. लहू कानडे, श्रीरामपूर.