थोरात यांच्या छबीचा असाही विक्रम !
By Admin | Updated: June 23, 2016 01:25 IST2016-06-23T00:41:46+5:302016-06-23T01:25:11+5:30
विलास गुंजाळ , संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालगत लावण्यात आलेला आमदार बाळासाहेब थोरात यांच्या फ्लेक्स बोर्ड चर्चेचा विषय बनला आहे

थोरात यांच्या छबीचा असाही विक्रम !
विलास गुंजाळ , संगमनेर
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालगत लावण्यात आलेला आमदार बाळासाहेब थोरात यांच्या फ्लेक्स बोर्ड चर्चेचा विषय बनला आहे. तब्बल १५ वर्षापेक्षाही अधिक काळापासून एकाच जागेवर थोरातांचा चेहरा झळकत असल्याने एकाच जागेवरील फ्लेक्स बोर्डचा हा अनोखा विक्रम ठरला आहे.
संगमनेर शहरात मध्यवर्ती भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. पुतळ्याजवळ नाशिक-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने दररोज हजारो नागरिक या रस्त्यावरून ये-जा करतात. थोरात समर्थकांनी फ्लेक्स बोर्डसाठी या जागेची निवड केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालगत गाडे यांच्या खासगी मालकीच्या इमारतीच्या भिंतीला हा फ्लेक्स बोर्ड झळकण्यास सुरूवात झाली. पाटबंधारे राज्यमंत्रीपद मिळाल्यापासूनच म्हणजे १९९९ नंतर या जागेवर थोरातांचा चेहरा झळकायला लागला. निवडणूक आचार संहितेचा कालावधी वगळता सलगपणे या जागेवर फ्लेक्सबार्ड अस्तित्वात आहे. नवीन वर्षाच्या स्वागतापासून सर्वधर्मीयांच्या सणानिमित्त शुभेच्छा असो वा प्रत्यक्ष थोरातांचे अभिनंदन असो. मजकूर बदलून फ्लेक्स बोर्डवर आ. थोरात सातत्याने झळकत आहेत. शहरातील फ्लेक्स बोर्डबाबत मध्यंतरी कारवाई केली होती. यानंतर विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगी घेतल्याशिवाय फ्लेक्स लावू नये अशी सूचना केली. यानंतर विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगी घेऊन आपआपल्या नेत्यांचे फ्लेक्स लावले. थोरातांच्या या फलकाचीही परवानगी घेतली गेली आहे. थोरात यांचा फलक कार्यकर्त्यांनी लावलेला आहे.
नगरपालिकेला कराचा भरणा
४फ्लेक्स बोर्ड हा खासगी मालकीच्या जागेत असल्याने संबंधित मालकाचे संमतीपत्र घेऊन नाममात्र दरात फ्लेक्सबोर्ड झळकत आहे. २०१५ साली विश्वास मुर्तडक व २०१६ साली गणेश मादास यांनी नगरपालिकेला १३६८ रूपये भरून पालिकेचा रितसर कर भरला. त्यापूर्वी किती पैसे भरले याची माहिती उपलब्ध झाली नाही.
शिवप्रेमींनी व्यक्त केली होती नाराजी
४छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्याही वर हा फ्लेक्स बोर्ड झळकत असल्याने मध्यंतरी शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी या फ्लेक्स बोर्डला आक्षेप घेतला होता. काही शिवसैनिकांनी भला मोठा भगवा झेंडा शिवाजी पुतळ्यामागे लावून थोरातांचा फ्लेक्स झाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या आक्षेपानंतरही हा फ्लेक्स बोर्ड झळकत असल्याने शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती.