चोरट्यांकडून मंदिर पुन्हा ‘लक्ष्य‘
By Admin | Updated: August 24, 2014 23:08 IST2014-08-24T23:00:52+5:302014-08-24T23:08:37+5:30
पारनेर : पारनेर तालुक्यात चोरट्यांनी मंदिरांना ‘लक्ष्य’ करण्याचा प्रकार सुरूच ठेवला आहे.

चोरट्यांकडून मंदिर पुन्हा ‘लक्ष्य‘
पारनेर : पारनेर तालुक्यात चोरट्यांनी मंदिरांना ‘लक्ष्य’ करण्याचा प्रकार सुरूच ठेवला आहे. कर्जुले हर्या येथील हरेश्वर मंदिरात शनिवारी रात्री चोरीचे घटना घडली. तर जागतिक दर्जाचे लवणस्तंभ असलेल्या दर्याबाई पाडळी येथील दर्याबाई मंदिराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाला. तसेच पारनेर येथे पोलिसांनी मोटारसायकल चोरणारी टोळी पकडली. नारायणगव्हाण गावात सरपंचाच्या पतीने महिलांना मारहाण केल्याची घटना घडली.
कर्जुले हर्या, दर्याबाई पाडळीत चोरी
शनिवारी रात्री चोरट्यांनी पाचव्यांदा नगर -कल्याण महामार्गावरील कर्जुले हरेश्वर येथील हरेश्वर मंदिरातील खिडकीचे गज कापून मंदिरातील तीनशे रूपये चोरल्याचीे घटना सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अनिल आंधळे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हरेश्वर मंदिरात ग्रामस्थांनी सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविले असून कॅमेऱ्यात एक चोर कैद झाल्याचे दिसत आहे. चोरीचे प्रकार सारखे घडत असून पोलिसांनी तातडीने चोरीचा तपास लावून आरोपींना अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दर्याबाई मंदिरात चोरीचा प्रयत्न
लवणस्तंभांमुळे जगप्रसिध्द असलेल्या दर्याबाई पाडळी येथील दर्याबाई देवीच्या मंदिरात चोरट्यांनी कुलूप तोडून प्रवेश केला व तेथील कपाट उचकून साहित्य अस्ताव्यस्त फेकले. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. याप्रकरणी पारनेर पोलिसांनी मंदिराची पाहणी केली. मात्र कोणीही याबाबत फिर्याद दिली नाही.
मोटारसायकल
चोर टोळी पकडली
पारनेर शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोटारसायकल चोरणारी टोळी सक्रिय झाली होती. यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक नाईक, नागेश्वर मित्र मंडळाचे आशिष औटी यांच्यासह अनेकांची वाहने चोरीस गेली होती. या मोटारसायकल चोऱ्यांमुळे पोलिसही हतबल झाले होते. शनिवारी दुपारी तीन तरूण एक मोटारसायकल घेऊन कान्हूरपठारस्त्यावरील ढाब्यासमोरून चालले असताना पोलीस अण्णा पवार व निमसे यांनी त्यांना हटकले व विचारपूस केल्यावर मोटारसायकल चोरीची असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी रोहित पोपट औटी रा.वरखेड मळा पारनेर यासह दैठणेगुंजाळ येथील एक व अन्य एका अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. यात रोहीत औटी याला पारनेर न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दहा मोटारसायकली
चोरल्याचा अंदाज
या मोटारसायकल चोरांनी पारनेर शहरासह परिसरात सुमारे दहा ते बारा मोटारसायकली चोरल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिस कोठडी मिळाल्यानंतर यातील चोरीचे प्रकार उघडकीस येतील असे पोलिसांनी सांगितले.
शेत नांगरणीवरुन
दोन गटात हाणामारी
कर्जत : शेत नांगरणीवरुन दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यामध्ये सासू, सून जखमी झाल्या. यासंदर्भात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून याप्रकरणी अद्याप कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. तालुक्यातील बारडगाव सुद्रिक शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी पार्वती हरिभाऊ फरांडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आमच्या घास पिकात हरिभाऊ कदम यांनी ट्रॅक्टर घालून नांगरणीला सुरुवात केली. याचा जाब विचारताच शिवीगाळ करुन दमदाटी करण्यात आली. व घासाचे नुकसान केले. त्यानंतर माझ्यासह सून संगीता शिवाजी फरांडे हिला मारहाण करण्यात आली. या फिर्यादीवरुन कर्जत पोलिसांनी जगन्नाथ मारुती कदम, रवींद्र जगन्नाथ कदम,भाऊसाहेब जगन्नाथ कदम,
सुरेश जगन्नाथ कदम, विजय भगवान गावडे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. मारहाणीमध्ये काठी, चैन, केबड यांचा वापर करण्यात आला. शेत नांगरण्यास अडथळा आणल्याच्या कारणावरुन दुसरी फिर्याद साधना भाऊ कदम यांनी दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी हरिभाऊ बयाजी फरांडे, पार्वती हरिभाऊ फरांडे, संदीप हरिभाऊ फरांडे, संगीता शिवाजी फरांडे, शिवाजी हरिभाऊ फरांडे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पुढील तपास पो.कॉ. गोसावी करीत आहेत.