शिर्डीबाबतचे ‘ते’ दु:ख कायम
By Admin | Updated: April 22, 2016 00:20 IST2016-04-22T00:20:11+5:302016-04-22T00:20:42+5:30
कोपरगाव : या भागातील नेत्यांच्या प्रचाराला मी नेहमी येत होतो़ आमच्या लोकांनी त्यांना निवडूनही दिलं़ मात्र माझ्यावेळी अॅट्रॉसिटीचा खोटा प्रचार केला गेला़ मी जरी पडलो, तरी काम थांबवले नाही,

शिर्डीबाबतचे ‘ते’ दु:ख कायम
कोपरगाव : या भागातील नेत्यांच्या प्रचाराला मी नेहमी येत होतो़ आमच्या लोकांनी त्यांना निवडूनही दिलं़ मात्र माझ्यावेळी अॅट्रॉसिटीचा खोटा प्रचार केला गेला़ मी जरी पडलो, तरी काम थांबवले नाही, आजही खासदार आहे़ पण शिर्डीचा खासदार झालो असतो तर आणखी चांगले काम केले असते़ शिर्डीचा खासदार झालो नाही, याचे दु:ख कायम राहिल, अशी खंत खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केली़
‘जाती तोडो, समाज जोडो’ अभियानांतर्गत कन्याकुमारी ते महू (मध्यप्रदेश) अशी भीम रथ यात्रा खासदार आठवले यांनी काढली़ या यात्रेचे कोपरगावमध्ये स्वागत करण्यात आले़ यावेळी झालेल्या जाहीर सभेत खा़ आठवले बोलत होते़ अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे होते़
नगराध्यक्ष रविंद्र पाठक, संजय सातभाई, अशोक गायकवाड, श्रीकांत भालेराव, तानसेन नन्नवरे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड, तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर, शहराध्यक्ष रावसाहेब साठे, नगरसेविका उज्ज्वला रणशूर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती़
बिपीन कोल्हे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, आठवले यांनी जाती तोडो, समाज जोडो अभियान राबवून यात्रा काढली़ त्यामुळे समाजात वैचारिक क्रांती होणार आहे़ डॉ़ बाबासाहेबांचे विचार घेवुन काढलेली ही यात्रा निश्चित सफल होईल़
आठवले पुढे म्हणाले, लोकशाहीत कोणत्या पक्षात जायचे, याचा अधिकार आम्हाला आहे़ भाजप सोबत जावुन आम्ही काही पाप केलं नाही़ पूर्वी शरद पवारांना मदत केली़ त्यांनी काही दिलं नाही, म्हणून सेना-भाजप बरोबर गेलो़ लोकसभेत राज्यात ४८ पैकी ४२ जागा निवडून आल्या़ विधानसभेत भाजपाबरोबर राहिलो़ त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले़ ते चांगले काम करीत आहेत़ त्यांनी दुष्काळग्रस्त भागाला न्याय द्यावा, पाणी द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करून आठवले म्हणाले, संविधान बदलणार, असा खोटा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरूद्ध केला जात आहे़ संविधानाला कुणी हात लावु शकत नाही, आणि लावला तर त्याचा सत्यानाश झाल्याश्विाय राहणार नाही़
(प्रतिनिधी)
माझ्या पायाला जरी आला फोड...
कन्याकुमारीपासून निघालेल्या यात्रेमुळे खा़ आठवलेंच्या पायाला फोड आले, असे बिपीन कोल्हे आपल्या भाषणात म्हणाले, त्याचा धागा पकडून आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता म्हणून दाखविली़
‘‘माझ्या पायाला आले असले जरी फोड
तरी मी सोडणार नाही समतेचा रोड’’
कारण मला आहे साऱ्या जातीच्या लोकांना
एकत्र करण्याची खोड’’ म्हणूनच लोक म्हणतात, आठवले साहेब आहेत फार गोड़’’