बोधेगाव, खरवंडी येथे पोलीस ठाणे व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST2021-03-06T04:19:46+5:302021-03-06T04:19:46+5:30
शेवगाव : शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील मोडकळीस आलेल्या पोलीस ठाणे इमारती, पोलीस वसाहत नव्याने बांधल्या जाव्यात, तसेच शेवगाव तालुक्यातील बोधेगाव तर ...

बोधेगाव, खरवंडी येथे पोलीस ठाणे व्हावे
शेवगाव : शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील मोडकळीस आलेल्या पोलीस ठाणे इमारती, पोलीस वसाहत नव्याने बांधल्या जाव्यात, तसेच शेवगाव तालुक्यातील बोधेगाव तर पाथर्डी तालुक्यातील खरवंडी येथे नव्याने पोलीस ठाण्याची निर्मिती करावी, आदी मागण्यांसाठी आमदार मोनिका राजळे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले.
आमदार राजळेंनी केलेल्या मागण्यांची दखल घेऊन अनिल देशमुख यांनी लवकरात लवकर संबंधित विषय मार्गी लावले जातील, असे आश्वासन दिले. वेगवेगळे संदर्भ असलेले तीन निवेदन यावेळी राजळेंनी दिले.
शेवगाव व पाथर्डी येथील पोलीस ठाण्याची इमारत ही ब्रिटिश काळातील असून अपुऱ्या जागेअभावी कर्मचाऱ्यांची काम करताना गैरसोय होत आहे. तसेच लॉकअपची इमारत जुनी झाल्याने सुरक्षितेच्यादृष्टीने धोकादायक झाली आहे. दोन्ही ठिकाणी नवीन इमारत व पोलीस कर्मचारी वसाहत व्हावी, यासाठी राज्य पोलीस हौसिंग ॲण्ड वेल्फेअर कार्पोरेशन, विभागीय कार्यालय नवी मुंबई यांच्याकडून शेवगावसाठी १५ कोटी ६० लाख रुपयांच्या तर पाथर्डीसाठी २७ कोटी ३९ लाख ५४ हजार २८० रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी राजळेंनी केली.
बोधेगाव येथे नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव आहे. ते पोलीस ठाण्याची जागा आहे. मोठ्या लोकसंख्येचे गाव असल्याने येथे पोलीस ठाणे होणे अत्यंत गरजेचे आहे. हिच परिस्थिती खरवंडीची असून येथेही नव्याने पोलीस ठाण्याची निर्मिती व्हावी. यासाठीचा प्रस्ताव व कागदपत्रांची पूर्तता झाली, आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी देशमुख यांनी राजळेंकडे माजी मंत्री अशोकराव डोणगावकर यांच्या तब्येतीची आत्मियतेने चौकशी केली. दादा माझे जुने सहकारी मित्र असल्याचे देशमुख यांनी म्हटले. तसेच राजळे यांना मागण्यांसंदर्भात आश्वस्त करताना मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावू, असे सांगितले.
----
०५ शेवगाव राजळे
आमदार मोनिका राजळे यांनी मुंबई येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.