विकासासाठी दोन्ही ठिकाणी एकच सरकार असावे
By Admin | Updated: July 14, 2014 00:58 IST2014-07-14T00:35:38+5:302014-07-14T00:58:47+5:30
अहमदनगर : राज्यात विकास हवा असेल तर केंद्र आणि राज्यात एकच सरकार असले पाहिजे.

विकासासाठी दोन्ही ठिकाणी एकच सरकार असावे
अहमदनगर : राज्यात विकास हवा असेल तर केंद्र आणि राज्यात एकच सरकार असले पाहिजे. यामुळे विकासाला चालना मिळते. हाच विचार करून आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने सत्ता बदल केला पाहिजे, असे मत केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री राधाकृष्णन् यांनी नगर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर राधाकृष्णन् यांनी नगर येथे खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात सत्तेत बदल झाला तरच विकास होईल. दोन्हीकडे दोन सरकारे असतील तर जनतेचे नुकसान होते. राज्यातील जनतेने भाजपाला साथ दिली तर त्यांचा फायदाच होईल. लोकांना आता विकास हवा आहे. विकासासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. चांगली भावना असली की कठोर निर्णय लोक सहन करतात. रेल्वेची भाडेवाढ अपरिहार्य होती. ही भाडेवाढ काही एक दिवसात झालेली नाही. निवडणुका डोळ््यासमोर ठेवून यूपीए सरकारने भाडेवाढीची अंमलबजावणी केली नाही. येत्या काही दिवसांमध्ये रेल्वे, रेल्वे स्थानकांमध्ये सुधारणा झालेली दिसेल. मोदी सरकारचा अर्थसंकल्प चांगला आहे. त्यामध्ये शेती आणि युवकांच्या विकासावर भर दिला आहे. अर्थसंकल्पात विकासाचा दृष्टिकोन स्पष्ट दिसत आहे. अर्थसंकल्पामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. पूर्वोत्तर राज्यांच्या विकासाला अधिक महत्त्व दिले आहे. महाराष्ट्रासह सर्वच राज्यांचा विकासासाठी विशेष योजना कार्यान्वित करण्यात येणार आहेत. मोदी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे देशाचा विकास दर ५ टक्क्यांनी निश्चितच वाढणार आहे. सरकारचे ५० दिवस आशादायी आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
कॉरिडॉरमुळे नगरला फायदा
देशाच्या गोल्डन कॉरिडॉरमध्ये पुण्याबरोबरच नगरचाही समावेश आहे. या कॉरिडॉरचे मुख्यालय पुणे येथे होणार आहे. त्यामुळे पुण्याजवळ असलेल्या नगरच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल.
राहुरी-पारनेर-नगर एसईझेडमध्ये
राहुरी-पारनेर-नगर या तालुक्यांचा एसईझेडमध्ये समावेश करावा, अशी मागणी खासदार दिलीप गांधी यांनी मंत्री राधाकृष्णन् यांच्याकडे केली. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर केल्यास त्यावर सकारात्मक निर्णय होईल, असे राधाकृष्णन् म्हणाले.