कोळगाव येथे मिनी एमआयडीसी व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:15 IST2021-07-19T04:15:22+5:302021-07-19T04:15:22+5:30
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे केंद्र शासनाची मिनी एमआयडीसी मंजूर करण्याची आग्रही मागणी नवजीवन बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे अध्यक्ष ...

कोळगाव येथे मिनी एमआयडीसी व्हावी
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे केंद्र शासनाची मिनी एमआयडीसी मंजूर करण्याची आग्रही मागणी नवजीवन बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुधीर लगड यांनी केंद्रीय लघू-मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे केली आहे.
कर्जतचे राजेंद्र निंबाळकर यांच्यामार्फत सुधीर लगड यांनी राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल त्यांना फोनद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी लगड यांनी कोळगाव येथे मिनी एमआयडीसी व्हावी, अशी मागणी केली. त्यावेळी पुढील महिन्यात मुंबई येथील निवासस्थानी भेटण्यासाठी येऊन सविस्तर निवेदन द्या. त्यानंतर आपण या प्रश्नावर योग्य तो मार्ग॔ काढू, असे आश्वासन राणे यांनी दिल्याचे लगड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कोळगाव व परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना गावातच रोजगार निर्माण होण्यासाठी केेंद्र शासनाच्या धोरणानुसार लघुउद्योगासाठी मिनी एमआयडीसी मंजूर होणे ही काळाची गरज आहे. कारण, कोळगाव व परिसरातील इतर गावे ही कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून परिचित आहेत. सुशिक्षित तरूण-तरूणींची संख्या मोठी असून बेरोजगारीही मोठ्या प्रमाणात आहे. केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार गावातच पारंपरिक असणाऱ्या लघुउद्योगांना शासनाच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रोजगारनिर्मिती करून गावातच लघुउद्योगांची स्थापना करणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ असलेले कोळगाव हे गाव योग्य आहे. जवळच विसापूर रेल्वेस्टेशन व विसापूर जलाशय आहे. मिनी एमआयडीसीसाठी शासनस्तरावर खासदार डॉ. सुजय विखे व राजेंद्र निंबाळकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचे लगड यांनी सांगितले.