जल आराखड्यावरील सूचनांना मुदतवाढ नाही
By Admin | Updated: September 22, 2015 00:24 IST2015-09-22T00:21:00+5:302015-09-22T00:24:16+5:30
अहमदनगर : जलसंपदा विभागाने मुळा व प्रवरा खोऱ्यातील पाण्याचा जल आराखडा तयार करून तो संकेतस्थळावर प्रसिध्द केला होता

जल आराखड्यावरील सूचनांना मुदतवाढ नाही
अहमदनगर : जलसंपदा विभागाने मुळा व प्रवरा खोऱ्यातील पाण्याचा जल आराखडा तयार करून तो संकेतस्थळावर प्रसिध्द केला होता. त्यावर सूचना, अभिप्राय नोंदविण्यासाठी १७ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत वाढविण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. प्रत्यक्षात राज्य सरकार पातळीवरून त्यास मुदतवाढ मिळालेली नाही. दरम्यान, महिनाभरात या जल आराखड्यावर जिल्ह्यातून ७०७ सूचना, अभिप्राय नोंदविण्यात आले असल्याची माहिती गोदावरी खोरे महामंडळाकडून देण्यात आली.
मुळा-प्रवरा उप खोऱ्यातील जवळपास ४०.५० टीएमसी पाणी काढून जायकवाडीला देण्याचा घाट जलसंपदा विभागाने घातला आहे. गोदावरी खोऱ्यात ३० उपखोरी आहेत. यात जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी, मुळा आणि प्रवरा खोऱ्यांचा समावेश आहे. या खोऱ्यातील अतिरिक्त राहणारे पाणी काढून ते मराठवाड्याला देण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाचा आहे. वास्तवात काहींच्या म्हणण्यानुसार गोदावरी खोरे हे तुटीचे, तर जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार गोदावरी खोरे हे साधारण खोरे आहे. जल आराखडा तयार करताना ज्या खोऱ्यात अतिरिक्त पाणी आहे, ते त्या ठिकाणाहून दुसऱ्या खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. यासाठी जल आराखडा तयार करण्यात आलेला आहे. दुसरीकडे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार गोदावरी खोरे हे सर्वसाधारण खोरे असताना त्यातील पाणी मराठवाड्याला दिल्यास नगर जिल्ह्यातील शेती, औद्योगिकीकरण आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. असे असताना जलसंपदा विभागाने मुळा व प्रवरा खोऱ्यातील पाण्याचा जल आराखडा तयार करून तो सूचना आणि हरकतींसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेला आहे. यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झालेले आहे. मराठवाड्याला पाणी देण्यास जिल्ह्यातून तीव्र विरोध होत आहे. यासाठी पाणी बचाव समितीही स्थापन करण्यात आलेली आहे. १७ तारखेपर्यंत जल आराखड्यावर सूचना नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ७०७ अभिप्राय, सूचना नोंदविण्यात आलेल्या आहे. १७ तारखेला गणेश चतुर्थी असल्याने १८ तारखेपर्यंत सूचना घेण्यात आलेल्या आहेत.
(प्रतिनिधी)