मुलांना बसण्यासाठी वर्गखोल्याच नाहीत; जि़प़ सभेत शाळा ऐरणीवर
By Admin | Updated: May 18, 2017 15:29 IST2017-05-18T13:53:57+5:302017-05-18T15:29:35+5:30
निर्लेखन झालेल्या शाळांमधील मुलांना बसण्यासाठी वर्गखोल्या नसल्यामुळे १४ जूनपासून उघड्यावरच शाळा भरवाव्या लागणार आहेत़

मुलांना बसण्यासाठी वर्गखोल्याच नाहीत; जि़प़ सभेत शाळा ऐरणीवर
आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि़ १८ - निर्लेखन झालेल्या शाळांमधील मुलांना बसण्यासाठी वर्गखोल्या नसल्यामुळे १४ जूनपासून उघड्यावरच शाळा भरवाव्या लागणार आहेत़ त्यामुळे निर्लेखन झालेल्या शाळांना तातडीने वर्गखोल्या मिळण्यासाठी जिल्हा नियोजनकडून निधी मिळावा, अशी मागणीचा ठराव जिल्हा परिषदेच्या सभेत करण्यात आला़
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा परिषदेची ही पहिलीच सर्वसाधारण सभा गुरुवारी सुरु झाली़ दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात मागील सभेचे इतिवृत्त वाचून सभेला प्रारंभ झाला़ सभा सुरु होताच सदस्यांनी निर्लेखन झालेल्या शाळांचा मुद्दा उपस्थित केला़ धोकादायक शाळांच्या वर्गखोल्या पाडण्यात आल्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गखोल्याच उपलब्ध नाहीत़ त्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर बसूनच धडे गिरवावे लागतील, असे सांगत सदस्यांनी जिल्हा नियोजनकडून निधी मिळण्याची मागणी केली़ तसेच काही शाळांच्या वर्गखोल्यांची तातडीने दुरुस्ती आवश्यक असून, या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करुन देण्याची मागणीही सदस्यांनी केली़ सभेसाठी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले, समिती सभापती कैलास वाघचौरे, अजय फटांगरे, उमेश परहर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे आदी उपस्थित होते़