तिसगाव : गाव व गावकऱ्यांना काय सोयीचे आहे. त्यांच्या सूचना विचारात घ्या. प्रस्तावित आराखड्यात त्या अनुरूप आवश्यक बदल करा. तरच केलेल्या विकास कामांचे मतात रूपांतर होईल, असा विश्वास खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केला.
तिसगाव (ता. पाथर्डी) येथे रूरबन योजना आढावा बैठकीत ते बोलत होते. अंदाजपत्रक दरातील तफावत, त्यामुळे ई टेंडर न भरण्याची ठेकेदारांची मानसिकता, रूरबन आराखडे ऑनलाईन करताना निकष अंती झालेल्या निधी कपात, पाणी योजनेतील राजकारण, पाणी गळती, गरज असेल तेथे लोखंडी पाईपचा वापर अशा विविध तक्रारींचा पाढा प्रसंगी वाचला गेला. यावेळी अनेकांनी तक्रारींचा पाढा वाचला.
सरपंच काशिनाथ लवांडे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, पं. स. सदस्य सुनील परदेशी, गोकुळ दौंड, अधिकारी शीतल खिंडे, किरण साळवे, डॉ. अरूण हरिश्चंद्रे, बाळासाहेब राजळे व्यासपीठावर होते.
समतल साठवण टाकी ते उंचीवरील मुख्य वितरण टाक्या या दरम्यानची पाईपलाईन लोखंडीच, असावी अशी मागणी नंदकुमार लोखंडे यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थातील पदाधिकारी ग्रामपंचायत स्तरावरील माहिती न देताच विकासकामे करतात. असा आरोप सुनील लवांडे पद्माकर पाथरे यांनी केला. जनावरांच्या दवाखान्यात एक्स रे मशीनची गरजच असल्याचा मुद्दा पुरुषोत्तम आठरे यांनी उपस्थित केला. आसाराम ससे यांनी रूरबन कामे बदलल्याची बाब गंभीर असल्याचे ठणकावले. उपस्थित प्रश्न व त्यावरील उत्तरांचा समन्वय खासदार विखे यांनी साधला. भाऊसाहेब लवांडे यांनी आभार मानले.
-----
तुम्हीच पाणी योजनेचे अध्यक्ष..
बैठकीच्या मध्यावर आलेल्या एकनाथ आटकर यांना पुढे येऊन बसा असा आदर देतानाच अजूनही पाणी योजनेचे अध्यक्ष तुम्हीच आहात, असे विखे म्हणाले. त्यामुळे चांगलाच हशा झाला. पाणी योजनेतील राजकारण दुर्दैवी असल्याची टिपण्णी करीत त्यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर निशाणा साधला.