अण्णांच्या हस्ते बसवललेल्या शहीद जवानाच्या पुतळ्याची चोरी
By Admin | Updated: April 28, 2017 16:06 IST2017-04-28T16:06:05+5:302017-04-28T16:06:05+5:30
शहीद जवान अरुण बबन कुटे यांच्या स्मरणार्थ जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते व तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते, आमदार विजयराव औटी यांच्या उपस्थितीत बसवलेला पुतळा चोरीला

अण्णांच्या हस्ते बसवललेल्या शहीद जवानाच्या पुतळ्याची चोरी
आॅनलाइन लोकमत
सुपा (अहमदनगर), दि़ २८ - पारनेर तालुक्यातील वडनेर येथील शहीद जवान अरुण बबन कुटे यांच्या स्मरणार्थ जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते व तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते, आमदार विजयराव औटी यांच्या उपस्थितीत बसवलेला पुतळा चोरीला गेल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
१९ आॅगस्ट २००३ रोजी जम्मू काश्मीर क्षेत्रात देश रक्षणासाठी, शत्रूचा सामना करीत असताना अरुण कुटे हा लष्करी जवान शहीद झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ ९० हजार रुपये किमतीचा ब्राँझ धातूचा पुतळा करून १ डिसेंबर २०११ रोजी अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते हा पुतळा बसवण्यात आला होता. या परिसराचे सुशोभीकरण केलेले असून पारनेर-विसापूर रोडलागत हे ठिकाण आहे़ अशा वर्दळीच्या ठिकाणाहून चोरट्यांनी पुतळा चोरून नेला़ ही घटना गुरुवारी रात्री घडली़ शुक्रवारी सकाळी तेथील पुतळा चोरीस गेल्याचे लक्षात आले़ याबाबत अरुणचे वडिल बबन कुटे यांनी पोलिसांना माहिती दिली़ वडनेर हे गाव अण्णांच्या राळेगणसिद्धी गावापासून जवळच आहे. घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी, पारनेर पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. याबाबत सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली आहे़