घोडेगाव येथे जबरी चोरी

By Admin | Updated: October 10, 2016 01:03 IST2016-10-10T00:43:32+5:302016-10-10T01:03:34+5:30

श्रीगोंदा : घोडेगाव (ता. श्रीगोंदा) येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालून महादेव दादाराम डेबरे यांच्या घरातून सोन्या, चांदीचे दागिने असा सुमारे चाळीस हजारांचा ऐवज चोरून नेला.

Theft in Ghodegaon | घोडेगाव येथे जबरी चोरी

घोडेगाव येथे जबरी चोरी


श्रीगोंदा : घोडेगाव (ता. श्रीगोंदा) येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालून महादेव दादाराम डेबरे यांच्या घरातून सोन्या, चांदीचे दागिने असा सुमारे चाळीस हजारांचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत डेबरे जखमी झाले आहेत. चोरट्यांची संख्या सात ते आठ होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली.
श्रीगोंदा- घोडेगाव मार्गावर घोडेगाव शिवारात रस्त्याच्या बाजूला डेबरे यांची वस्ती आहे. नेहमीप्रमाणे डेबरे कुटुंबीय जेवण करून झोपले असता, पहाटे दोनच्या सुमारास घरासमोरील कुत्रे मोठ्याने भुंकू लागल्याने डेबरे दाम्पत्य जागे झाले. बाहेर कोण आहे, याचा अंदाज घेत असतानाच चोरट्यांनी दरवाजावर मोठा दगड टाकून दरवाजा तोडला व घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी महादेव डेबरे यांच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
चोरट्यांनी या वेळी डेबरे यांच्या पत्नीच्या गळ्यातील, कानातील सोन्याचे दागिने काढून घेत घरातील सामानाची उचकापाचक केली. चोरट्यांचे घरात तासभर वास्तव्य होते. घरात विशेष वस्तू नसल्याने चोरट्यांनी घरातील सर्व वस्तू एकत्र केल्या व घरातून बाहेर जाताना डेबरे यांचा मोबाईल दगडाने फोडला. चोरट्यांनी जाताना आरडाओरडा करू नका, आम्ही बाहेरच थांबणार आहोत, असे डेबरे यांना सांगून घराचा दरवाजा बाहेरून लावून घेत पोबारा केला.
चोरट्यांनी घरात प्रवेश करण्यापूर्वी बाहेरील सर्व बल्ब फोडून टाकले. त्यामुळे घराबाहेर अंधार होता. चोरटे गेल्यानंतर डेबरे दाम्पत्यांनी मदतीसाठी ओरडा केला. मात्र त्यांच्या मदतीला कोणी आले नाही. मात्र पहाटे साडेपाचच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या एकाने डेबरे यांचा आवाज ऐकला. त्यानंतर जखमी डेबरे यांना रुग्णालयात हलविले. श्रीगोंदा पोलिसांनी निरीक्षक साहेबराव कडनोर यांच्या मार्गदर्शनाखाली पेडगाव, टाकळी, आढळगाव परिसरातील काही वस्त्यांवर छापे टाकले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Theft in Ghodegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.