धनगर आरक्षण प्रश्नावर जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून गायब, आंदोलक सकाळी सापडले
By सुदाम देशमुख | Updated: September 27, 2024 10:42 IST2024-09-27T10:42:15+5:302024-09-27T10:42:32+5:30
प्रवरा संगम पूलापासून खाली साधारण २ किलोमीटर अंतरावर आंदोलक मिळून आले

धनगर आरक्षण प्रश्नावर जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून गायब, आंदोलक सकाळी सापडले
नेवासा (जिल्हा अहमदनगर): गेल्या नऊ दिवसापासून धनगर आरक्षण प्रश्नावर आम्ही उपोषण करत आहोत सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करीत दोन आंदोलकांनी गुरुवारी दुपारी जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून गायब झाले होते. त्यांचा काल रात्री रात्रभर शोध सुरू होता. अखेर सकाळी एका मच्छीमाराने दिलेल्या माहितीनुसार हे दोन आंदोलन आढळून आले आहेत. पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी सकाळी "आम्ही जलसमाधी घेत आहोत तुम्हाला अखेरचा जय मल्हार" असे चिठ्ठीत नमूद करून प्रल्हाद सोरमारे व बाळासाहेब कोळसे हे दोन आंदोलन गायब झाले होते. त्यांनी छत्रपती संभाजी नगर- अहमदनगर मार्गावरील प्रवारासंगम नदीच्या पुलावर ही चिठ्ठी एका कारवर ठेवली होती. तसेच बाजूला आपला मोबाईल आणि चपलाही ठेवल्या होत्या. त्यानंतर ते गायब झाले होते. त्यांनी जलसमाधी घेतली असल्याची शक्यता व्यक्त करून एनडीआरएफ पथक आणि प्रशासनाने त्यांचे शोधकार्य ही हाती घेतले होते. रात्र झाल्याने हे शोधकाम थांबवण्यात आले होते. अखेर शुक्रवारी सकाळी मच्छीमारांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आणि एनडीएआरएफच्या पथकाने शोध घेतला असता हे दोघेही आंदोलक नदीपात्र परिसरात मिळून आले.
आंदोलकांनी उडी मारली अशी माहिती मिळाल्यानंतर नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी ही सूचना स्थानिक मच्छीमारांना देऊन अशी काही दुर्घटना दिसून आल्यास कळवण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे स्थानिक मच्छीमारांनी ही माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना दिली. त्यानुसार पोलिसांनी पाहणी केली असताना आणि प्रत्यक्षदर्शीच्या मासेमारी करणाऱ्याच्या सांगण्यानुसार दोघे चालत-चालत येऊन चप्पुवर झोपले होते.त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.