संगमनेर - सध्या राज्यात भाकड जनावरे, गोऱ्हे यांचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीच्या गरजेनुसार पाळलेली जनावरे जेव्हा भाकड होतात, त्यावेळी त्या जनावरांचा उपयोग होत नाही. परंतु सद्यस्थितीत अशा जनावरांची खरेदी-विक्री पूर्णपणे बंद असल्याने ही जनावरे शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक बोजा बनली आहे. त्यामुळे सरकारने भाकड जनावरे आणि गुऱ्हे खरेदी योजना राबवावी, अशी मागणी शिव आर्मी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले असून बुधवारी (दि.१२) संगमनेरातील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवनात आंदोलन जनावरे, गोऱ्हे बांधण्यात आली आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २९ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संगमनेर उपविभागीय कार्यालयाच्या माध्यमातून निवेदन पाठविण्यात आले होते.
दुधाला दर मिळत नाही. त्यात भाकड जनावरे, गोऱ्हे यांचे संगोपन करणे, त्यांची देखभाल करणे हा खर्चिक आणि वेळखाऊ प्रकार आहे. तो सामान्य शेतकऱ्यांना परवडत नाही. परिणामी अनेक वेळा जनावरे रस्त्यांवर सोडली जातात. त्यामुळे अपघात शेतीचे नुकसान आणि सामाजिक समस्या निर्माण होतात. या जनावरांचा योग्य तऱ्हेने संगोपन करण्यासाठी गोशाळा किंवा शासकीय केंद्र स्थापन करावी. आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.