शिर्डी : साई संस्थानने साईभक्तांना नववर्षाची भेट दिली असून, सामान्य रांगेतील २ साईभक्तांना आरतीसाठी समाधीजवळ सन्मानाने पुढे उभे राहण्याची संधी मिळणार आहे. पंढरपूरला आषाढी व कार्तिकी एकादशीला वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून रांगेतील पहिल्या दोघांना मुख्यमंत्र्यांबरोबर पूजेचा मान असताे. त्याच धर्तीवर साई संस्थाननेही हा निर्णय घेतला आहे. रोजच मध्यान्ह आरती, धुपारती व रात्रीच्या शेजारतीला भाविकांना ही संधी मिळणार असल्याचे साई संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले. आरतीपूर्वी अर्धा तास अगोदर दर्शन रांग बंद करण्यात येते. यावेळी जे पुढे असतील अशा दोन साईभक्तांना ही संधी मिळणार आहे.
झाशीच्या भाविकांना मिळाला पहिला मानवर्षातील पहिल्या आरतीचा मान उत्तर प्रदेशातील झाशीचे भाविक मनीष रजक व पूजा रजक यांना मिळाला. सकाळी ७ वाजता दर्शनासाठी रांगेत आम्ही उभे राहिलाे. साडेअकराच्या सुमारास अचानक संस्थानच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सन्मानपूर्वक साई समाधीसमोर आरतीसाठी उभे केले. ही अनपेक्षित घटना होती. आमचे जीवन कृतार्थ झाले, अशी भावना रजक दाम्पत्याने व्यक्त केली.