नेवासा : नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथे शुक्रवारी एका व्यक्तीचे निधन झाले. वडिलांच्या निधनाच्या धक्क्याने दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि. ३) त्यांच्या नऊ वर्षीय मुलीनेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली. बाळासाहेब गेणदास जाधव (वय ३८), श्रद्धा बाळासाहेब जाधव (वय ९) असे मृत्यू झालेल्या बापलेकीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब जाधव यांना किडनीचा आजार होता. नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना शुक्रवारी (दि. २९ नोव्हेंबर) त्यांचे निधन झाले. शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांच्या निधनाचा धक्का बसल्यामुळे श्रद्धाला श्रीरामपूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, शनिवारी (दि. ३०) मध्यरात्री १२:३०च्या सुमारास उपचारादरम्यान श्रद्धाचेही निधन झाले.
दरम्यान, या घटनेमुळे जाधव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला, श्रद्धा ही शिरेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत होती. बाळासाहेब जाधव यांचा शेती हा व्यवसाय होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, दोन भाऊ असा परिवार आहे.