मोदींचा जप करणारे ठाकरेच आता देताहेत शिव्याशाप
By Admin | Updated: September 30, 2014 23:19 IST2014-09-30T22:59:16+5:302014-09-30T23:19:49+5:30
राहाता : मोदींच्या नावाचा जप करणारे उद्धव ठाकरेच आता त्यांना शिव्याशाप देऊ लागले असल्याची टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

मोदींचा जप करणारे ठाकरेच आता देताहेत शिव्याशाप
राहाता : राज्यात मुख्यमंत्री कोण होणार, याच कारणाने महायुतीत घटस्फोट झाला. प्रश्नांच्या मुद्यांवरून युती तुटली असती, तर आपण मान्य केले असते. पण निवडणुकीपूर्वीच मंत्रिपदे वाटून घेण्याची स्पर्धा लागल्याने महायुती तुटली. कालपर्यंत नरेंद्र मोदींच्या नावाचा जप करणारे उद्धव ठाकरेच आता त्यांना शिव्याशाप देऊ लागले असल्याची टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील उंबरी-बाळापूर, रहिमपूर आदी ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकांमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. रहिमपूर येथील बैठकीत थोरात गटाने विखे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
रहिमपूर येथे तुकाराम पा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अॅड. बापूसाहेब गुळवे, अॅड. अशोकराव जोंधळे, अॅड. सोमनाथ शिंदे, विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ, रहिमपूरचे माजी सरपंच शांताराम शिंदे, लक्ष्मण गुळवे, बापूसाहेब शिंदे, संभाजी शिंदे, विश्वनाथ शिंदे, अॅड. चांगदेव वाळुंज यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक पातळीवर विखे-थोरात गटाचे झालेले मनोमिलन हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानले जाते.
विखे म्हणाले की, दोन्ही गटाने एकत्र येणे हा रहिमपूर गावाच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे. राजकारणात अनेक चढ-उतार आपण पाहिले. वैचारिक असलेले मतभेद हेच कार्यकर्त्यांमध्ये विसंगती निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. दोन्ही तालुक्यांच्या पलीकडे जावून आता जिल्ह्याच्या दृष्टीनेही विचार करण्याची वेळ आली आहे. २००४ साली आपण एकत्रित निवडणूक लढलो. त्या निवडणुकीची खऱ्या अर्थाने पुनरावृत्ती होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
देशात आणि राज्यात राजकीय धृवीकरण मोठ्या प्रमाणात घडले आहे. देशात चार महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने केवळ ‘सपने बेचो’ चा धंदा सुरू केला आहे. मोदींना केवळ उद्योगपती आणि पुंजीपतींची स्वप्ने पडतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे त्यांना कोणतेही देणेघेणे राहिलेले नाही. चार महिन्यांत एकही शेतकरी हिताचा निर्णय ते घेऊ शकले नाहीत. त्यामुळे मोदी सरकारच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली असून, या सरकारवर आता लोकांना विश्वास राहिलेला नाही.
चार महिन्यांपूर्वी आपण ज्या खासदाराला निवडून दिले तो साधे आभार मानायलाही आपल्याकडे आलेला नाही. याकडे लक्ष वेधून ग्रामीण भागातील प्रश्न, शेती, पाणी यांचा कोणताही अभ्यास नसलेली माणसे केवळ पदांसाठी भांडत आहेत. कालपर्यंत मोदींचे गुणगान गाणारे उद्धव ठाकरे आज त्यांनाच शिव्याशाप देत आहेत. एकूणच सत्तेसाठी हपापलेल्या या नेत्यांना राज्यात कोणीही थारा देणार नाही. म्हणूनच काँग्रेसची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचा विश्वास विखे यांनी व्यक्त केला. उंबरी-बाळापूर, रहिमपूर आदी ठिकाणी झालेल्या विखे यांच्या झंझावाती दौऱ्यास ग्रामस्थ, काँग्रेस कार्यकर्ते, युवक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (वार्ताहर)