डीएड, बीएडच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना देता येणार टीईटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST2021-09-02T04:45:10+5:302021-09-02T04:45:10+5:30

चंद्रकांत शेळके अहमदनगर : डीएड, बीएड अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही आता टीईटी परीक्षा देण्याची संधी मिळणार ...

TET can be given to final year students of DEAD, BEAD | डीएड, बीएडच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना देता येणार टीईटी

डीएड, बीएडच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना देता येणार टीईटी

चंद्रकांत शेळके

अहमदनगर : डीएड, बीएड अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही आता टीईटी परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. नगर जिल्ह्यात सुमारे बाराशे विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ‘टीईटी-२०२१’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून टीईटी परीक्षा होऊ शकली नाही. दोन वर्षांनंतर आता १० ऑक्टोबरला ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यावर्षी मात्र या प्रक्रियेमध्ये डीएड आणि बीएड अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना या परीक्षेची संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे डीएड, बीएड अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना टीईटीसाठी अर्ज भरता येणार आहे.

नगर जिल्ह्यात एकूण ४७ डीएड महाविद्यालये असून, त्यातील ३५ महाविद्यालयांमध्ये सध्या प्रवेश सुरू आहेत. त्यात ५ अनुदानित, तर इतर ३० विनाअनुदानित महाविद्यालये असून, एकूण जागा १९३० आहेत. यंदा प्रवेश प्रक्रियेत केवळ ५४० प्रवेश झालेले आहेत, तर दुसऱ्या वर्षांत ६७० विद्यार्थी शिकत आहेत. या ६७० विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षा देता येणार आहे.

दुसरीकडे जिल्ह्यात १३ बीएड काॅलेज असून, त्यात अंतिम वर्षात ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डीएड व बीएड, अशा एकूण १२७० विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षेचा फायदा होणार आहे.

------------------

जिल्ह्यात डीएडच्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी - ६७०

बीएडच्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी - ६००

--------------------

१० ऑक्टोबरला परीक्षा

यंदाची टीईटी परीक्षा १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यादृष्टीने ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. डीएड व बीएडच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना अर्ज भरता यावा म्हणून टीईटी अर्ज भरण्याची मुदत ५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.

-----------

डीएड व बीएडच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षा देता यावी, यासाठी शिक्षण आयुक्तांकडे निवेदन दिले होते. त्यानुसार परीक्षा परिषदेने हा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

-प्रशांत म्हस्के, राज्याध्यक्ष, शिक्षक-प्रशिक्षक संघ

Web Title: TET can be given to final year students of DEAD, BEAD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.