अफगाणिस्तानात तणाव, सुकामेव्याचे दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:25 IST2021-08-21T04:25:34+5:302021-08-21T04:25:34+5:30
अहमदनगर : अफगाणिस्तानात तणाव वाढल्याचा परिणाम जिल्ह्यातील सुकामेवा पुरवठ्यावर झाला आहे. सर्वच सुकामेवा अफगाणिस्तातून येत नसला तरी सुकामेव्याचे दर ...

अफगाणिस्तानात तणाव, सुकामेव्याचे दर वाढले
अहमदनगर : अफगाणिस्तानात तणाव वाढल्याचा परिणाम जिल्ह्यातील सुकामेवा पुरवठ्यावर झाला आहे. सर्वच सुकामेवा अफगाणिस्तातून येत नसला तरी सुकामेव्याचे दर वाढले आहेत. पुढच्या महिन्यात हे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात राज्याबाहेरून सुकामेव्याचा पुरवठा होतो. ठोक विक्रेते आठ ते दहा दिवसांच्या मालाची मागणी नोंदवितात. काही सुकामेवा अफगाणिस्तानातून आयात होतात. सध्या अफगाणिस्तानात तणाव वाढल्याने व्यापार ठप्प झाला आहे. मालाची आवक होत नसल्याने त्याचा परिणाम जिल्हास्तरापर्यंत दरवाढीत झाला आहे. त्यामुळे सर्वच सुकामेव्यामध्ये ३० ते ४० टक्के दरवाढ झाली आहे. आगामी काळात अशीच परिस्थिती राहिली तर दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
----------
एक आठवड्याचाच माल शिल्लक
१) जिल्ह्यात सध्या आठवडाभर पुरेल एवढाच सुकामेव्याचा माल शिल्लक आहे. पुढील मागणीही व्यापाऱ्यांनी नोंदवली आहे; परंतु अद्याप मालाचा पुरवठा कुठे झाला आहे, कुठे झालेला नाही.
२) अंजिर, खजूर, पिस्ता हा सुकामेवा अफगाणिस्तातून येतो. सर्वच सुकामेवा अफगाणमधून येत नाहीत. इराण, इराक, अमेरिकामधूनही सुकामेवा येतो. त्यामुळे सर्वच सुकामेव्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असे नाही. मात्र दर वाढत आहेत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
---
दर पूर्ववत होणे कठीण
दर आठवड्याला सुकामेव्याची मागणी केली जाते. दिल्ली येथील दरांवर सुकामेव्याचे दर अवलंबून असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी दरात बदल होतो. व्यापारी पुढील मागणी नोंदवितात. मात्र, आता नव्या मालाची प्रतीक्षा आहे.
-गणेश धावडे, व्यापारी
-------------
सुकामेव्यापैकी फक्त बदाम या एकाच सुकामेव्यामध्ये दरवाढ झाली आहे. सर्वच सुकामेवा अफगाणिस्तानामधून येत नाही. मात्र, अफगाणिस्तान-भारत यामधील व्यापारावर तणावाचा परिणाम होतो. सुकामेवा येईल की नाही, असे वाटत असल्याने दरवाढ अटळ मानली जाते.
-संजय साखरे, व्यापारी
------------
किरकोळ दर (प्रतिकिलो)
सुकामेवा पूर्वीचे भाव सध्याचे भाव
बदाम ९०० १२००
काजू १००० १०००
काळ्या मणुका ६४० ६४०
अंजिर १२०० १४००
आक्रोड ९०० ९००
पिस्ता १६०० १६००
--------------
डमी क्रमांक- १०७२