निविदाधारकांचा ठेंगा
By Admin | Updated: July 10, 2014 00:35 IST2014-07-09T23:36:11+5:302014-07-10T00:35:07+5:30
पारनेर : राज्य बँकेने पारनेर साखर कारखाना विक्रीसाठी निविदा काढल्यानंतर कोणीच निविदा भरली नसल्याने पारनेर कारखाना विक्रीचा राज्य बँकेचा निर्णय फसला होता.

निविदाधारकांचा ठेंगा
पारनेर : राज्य बँकेने पारनेर साखर कारखाना विक्रीसाठी निविदा काढल्यानंतर कोणीच निविदा भरली नसल्याने पारनेर कारखाना विक्रीचा राज्य बँकेचा निर्णय फसला होता. आता पुन्हा विक्रीची फेरनिविदा बँकेने काढली असून १७ जुलैला विक्री होणार आहे. परंतु दुसऱ्या निविदेलाही ठेंगा देत अद्याप कोणीही विक्री निविदेत सहभागी झाले नाहीत. दरम्यान, उदय शेळके यांनी वसुली न्यायप्राधिकरणाकडे केलेल्या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.
पारनेर साखर कारखाना विक्री करण्याचा निर्णय राज्य बँकेने घेतला होता व त्याची निविदाही प्रसिध्द केली होती. याविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आमदार विजय औटी, कामगार नेते आनंद वायकर व शेतकऱ्यांच्यावतीने सुभाष बेलोटे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विक्री विरोधात याचिका दाखल केली होती. तर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष उदय शेळके यांनी वसुली न्यायप्राधिकरणाकडे दाद मागितली होती, मात्र विक्रीसाठी कोणतीच निविदा आली नसल्याचे राज्य बँकेने न्यायालयात सांगितल्यानंतर न्यायालयाने याचिका निकाली काढली होती. पुन्हा निविदा काढल्यानंतर न्यायालयात दाद मागता येईल, असे न्यायालयाने सांगितले होते.
१७ जुलैला निविदा उघडणार
पारनेर कारखाना विक्रीसाठी राज्य बँकेने पुन्हा निविदा प्रसिध्द केली आहे. यामध्ये बँकेने ऐंशी कोटींचेच कर्ज दाखवले आहे. पंधरा जुलैपर्यंत निविदा दाखल करण्यास सांगितले असून १७ जुलै रोजी निविदा उघडण्यात येणार आहे. विक्रीमध्ये पारनेर साखर कारखान्यातील यंत्रसामुग्रीसह सुमारे ४७ हेक्टर जमिनीचाही समावेश आहे.
विक्रीसाठी निरुत्साह
बँकेने निविदा काढल्यानंतर आतापर्यंत कोणीही विक्रीसाठी निविदा भरण्यास पुढे आले नसल्याची माहिती आहे. निविदा भरण्यास आणखी आठवड्याचा कालावधी असल्याने यात कोण सहभागी होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. विक्री निविदा प्रसिध्द केल्यानंतर त्यात कर्जाची रक्कम वाढीव असल्याने व नंतर कारखाना विकत घेतल्यावर कामगार व इतर देणी लिलाव घेणाऱ्याने द्यायची असल्याने सगळाच बोजा लिलावधारकावर पडत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.
जाधव यांचा संशय
दरम्यान, निविदा भरताना कोणी आले नाही असे दाखवायचे व नंतर कमी भावात कारखाना विकायचा असा डाव असू शकतो, असा संशय कारखान्याचे माजी संचालक शिवाजी जाधव यांनी व्यक्त केला आहे.
नव्याने सुनावणी
जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष उदय शेळके यांनी वसुली न्यायप्राधिकरणाकडे याचिका दाखल केल्यानंतर त्यावर दोनदा सुनावणी झाली. आता पुन्हा नव्याने सुनावणी होणार आहे.
(तालुका प्रतिनिधी)
सर्वपक्षीय बैठक
पारनेर साखर कारखाना बाचविण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या पध्दतीने दोन ते तीन दिवसात बैठकीचा निर्णय घेऊ.
शिवाजी जाधव,
माजी संचालक, पारनेर कारखाना
कामगार अस्वस्थ
पारनेर विक्री प्रक्रियेत अजून कोणीही सहभागी झालेले नसले तरी नंतर राज्य बँक काय निर्णय घेणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे कामगारांमध्येही अस्वस्थता आहे. एकीकडे पाऊस नाही तर दुसरीकडे कारखानाही बंद राहिला तर अनेक कामगारांची कुटुंबे संकटात येण्याची शक्यता आहे.