मंगळवारी सकाळी जगदंबा देवी देवस्थान विश्वस्त व पुजारी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी विश्वस्त अध्यक्ष निळकंठ देशमुख, तुकाराम सागडे, भीमाशंकर देवगावकर, अरुण रेणूकर, सुनील रेणूकर, ॲड. सचिन रेणूकर, प्रकाश रेणूकर, श्रीकांत वाघमारे, गजानन रेणुके, सदानंद बारभाईसह पुजारी उपस्थित होते.
दरम्यान सिध्दटेक व कुळधरण हे सोमवारी संध्याकाळीच बंद करण्यात आले. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पायरीचे दर्शन होणार आहे. तर मंदिरातील देवाची नित्यपूजा फक्त पुजाऱ्याच्या हस्ते होणार असल्याचेही जाहीर केले.
राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत, राशीन येथील जगदंबा देवी देवस्थानच्या वतीने मुख्य दरवाजा बंद करून प्रवेशद्वारावर बॅरिकेट बसवण्यात आले आहेत. ५ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद केले आहे. पहाटे साडेपाच वाजता आरती झाल्यानंतर देवीचे दर्शन गाभारे, नैवेद्यापर्यंत खुले असतील. यानंतर संध्याकाळच्या आरतीपर्यंत बंद असतील. यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटे उघडले जातील.
कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन १३ एप्रिल रोजी असलेली गुढीपाडवा या सणाबरोबरच तेलवण अष्टमी व पौर्णिमा हे कार्यक्रम नित्यपूजेप्रमाणे बंद मंदिरात मोजक्या पुजाऱ्यांच्या हस्ते पार पडतील. दरम्यान, राशीनचे जगदंबा देवी मंदिर मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे गावातील सर्व पूजा साहित्य दुकाने उघडली होती. मंदिर बंद करण्यात आल्यानंतर अनेक व्यावसायिकांनी आपली दुकानेही बंद केली.