कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू
By Admin | Updated: June 4, 2014 00:16 IST2014-06-04T00:10:41+5:302014-06-04T00:16:32+5:30
जामखेड : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच नागरिकांना एक धक्का बसला.
कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू
जामखेड : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच नागरिकांना एक धक्का बसला. जामखेडकरांशी त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे स्वयंपूर्तीने जामखेड बंद केले. दुपारी बाराच्या सुमारास सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने शोकसभा आयोजित करून श्रद्धांजली वाहण्यात आली. केंद्रीयमंत्री गोपीनाथ मुंडे दोन दिवसापूर्वीच तालुक्यातील चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आले होते. त्यांनी राष्टÑीय समाज पक्षाच्या वतीने आयोजित धनगर समाजाच्या मेळाव्यात भाषण करून समाजाला आपलेसे केले होते. ‘‘तुमचं घोंगडं अंगावर घेतलं आहे’’ तुमचे प्रश्न मी सोडवणार अशी ग्वाही दिली. माझ्या खात्यामार्फत ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलून अहिल्यादेवींच्या कारभाराप्रमाणे राज्य कारभार करू, असे बोलले होते. माझा राजकीय वारसा म्हणून महादेव जानकर यांचे नाव घेतले होते. या घटनेला ४८ तास होत नाही तोच मुंडे यांच्या निधनाचे वृत्त आले. दोन दिवसापूर्वी बोललेल्या शब्दाने संपूर्ण धनगर समाज व तालुका मंत्रमुग्ध झाला होता. जामखेड तालुक्याचे सर्व व्यवहार बंद ठेवून आदरांजली वाहिली. तहसील कार्यालयासमोर शोकसभा आयोजित केली. त्यामध्ये अनेक व्यक्तींनी मुंडेच्या कामाचा व व्यक्तीगत भेटीचा उल्लेख करून विश्वास बसत नाही, अशी घटना असा उल्लेख केला. पं. स. सभापती डॉ.भगवान मुरूमकर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रा.मधुकर राळेभात, राष्टÑवादीचे दत्तात्रय वारे, प्रा.संजय वराट, शहाजी राळेभात, भाजप तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, इस्माईल सय्यद, जाकीर सर, मनसे प्रमुख प्रदिप टापरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अॅड. बंकटराव बारवकर, सुरेश भोसले, डॉ.कैलास हजारे, पोलिस निरीक्षक संजय पाटील, वैजीनाथ पाटील, अमित जाधव, अॅड.हर्षल डोके, कुंडळ राळेभात, अॅड. हिरालाल गुंदेचा यांनी श्रद्धांजली वाहिली.