शिक्षिकेची स्वरचित गाणी लाॅकडाऊनमध्ये घराघरांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:22 IST2021-01-03T04:22:36+5:302021-01-03T04:22:36+5:30

चंद्रकांत शेळके लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : पाठ्यपुस्तकातील धडे आहेत तसे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, त्यांच्या गळी उतरवणे, असा सर्वसाधारण शिकवताना ...

Teacher's self-composed songs in the lockdown at home | शिक्षिकेची स्वरचित गाणी लाॅकडाऊनमध्ये घराघरांत

शिक्षिकेची स्वरचित गाणी लाॅकडाऊनमध्ये घराघरांत

चंद्रकांत शेळके

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : पाठ्यपुस्तकातील धडे आहेत तसे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, त्यांच्या गळी उतरवणे, असा सर्वसाधारण शिकवताना शिक्षकाचा नित्यक्रम असतो; परंतु काही शिक्षक आपल्यातील कलागुणांची गोळाबेरीज करून त्याला अध्ययनाची प्रभावी जोड देत विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करतात. अशाच एक शिक्षिका आहेत नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा शाळेतील सुमन तिजोरे. लाॅकडाऊनमध्ये त्यांनी पारंपरिक अध्ययनाऐवजी स्वरचित गाणी, कविता, तसेच क्रमिक अभ्यासक्रमांचे धडे स्वत: स्टुडिओमध्ये रेकाॅर्डिंग करून ते यू-ट्यूबवर खुले केले आहेत. त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.

वडाळा बहिरोबा येथे सातवीपर्यंत शाळा असून शाळेत साधारण सव्वातीनशेचा पट आहे. त्यात तिसरीचा वर्ग तिजोरे मॅडमकडे आहे. मुळातच तिजोरे यांना काॅलेजला असतानापासून गायनाची आवड होती. त्यामुळे त्या या गायनाचा प्रभावी उपयोग सध्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनात करतात. दैनंदिन परिपाठात विविध गाणी, प्रार्थना म्हणण्यापासून दरवर्षीचा शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्याची जबाबदारी आपसूक गायनाच्या गुणांमुळे त्यांच्याकडेच येते. त्यात गाणी लिहिण्यापासून ती गाणी गाण्यापर्यंत व त्यावर विद्यार्थ्यांचे नृत्य बसवण्याची अष्टपैलू भूमिका ते निभावतात.

लाॅकडाऊनमध्ये शाळा बंद असताना त्यांनी गायनाच्या कलेचा प्रभावी वापर केला. विद्यार्थ्यांना पारंपरिक लिखापढीपेक्षा दृकश्राव्य पद्धतीने अधिक पटीने ग्रहण होते, या मानसशास्त्राप्रमाणे त्यांनी काम केले. विद्यार्थ्यांच्या क्रमिक पुस्तकातील कविता, धडे याशिवाय स्वरचित कविता, गाणी, अभंग, प्रार्थना अशा सुमारे २० ते २५ व्हिडिओंचे त्यांनी स्टुडिओत रेकाॅर्डिंग करून ते यू-ट्यूबवर अपलोड केले. थोड्याच दिवसांत त्यांना हजारो व्ह्यूज मिळाल्या. त्याच्या गाण्यांच्या लिंक आता विद्यार्थ्यांबरोबरच इतरांनाही उपयोगी ठरत आहेत.

--------------

पुस्तकरूपी मार्गदर्शन

शिक्षिका तिजोरे यांची आतापर्यंत बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात त्यांनी लाॅकडाऊनमध्ये ‘चला वर्ग करू प्रगत’ हे पुस्तक लिहिले आहे. शिक्षकांसाठी असलेल्या या पुस्तकात विशेषता पहिलीचा वर्ग कसा प्रगत करावा, याबाबत खास टिप्स आहेत. अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी आवश्यक उपक्रम या पुस्तकात आहेत.

---------------

३०० झाडांची रोपवाटिका

तिजोरे यांना वृक्षलागवडीची आवड असल्याने त्यांनी स्वखर्चाने बियाणे उपलब्ध करून ३०० रोपे तयार केली. त्यातील १०० रोपांचे गावात रोपण केले. तर इतर झाडे तालुक्यातील शाळांना भेट दिली. यासह महिला सक्षमीकरणासाठी त्या मार्गदर्शन करतात.

--------

फोटो - ०२सुमन तिजोरे

Web Title: Teacher's self-composed songs in the lockdown at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.