कोंची येथे शिक्षक धावले आदिवासींच्या मदतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 19:42 IST2018-03-01T19:42:23+5:302018-03-01T19:42:34+5:30
संगमनेर तालुक्यातील कोंची येथे नुकतीच चार आदिवासी कुटुंबांची घरे आगीत खाक झाली. सामाजिक बांधिलकी जपत कोंची जि. प. शाळेच्या शिक्षकांनी संसारोपयोगी साहित्य देत या कुटुंबांना मदत केली.

कोंची येथे शिक्षक धावले आदिवासींच्या मदतीला
संगमनेर : तालुक्यातील कोंची येथे नुकतीच चार आदिवासी कुटुंबांची घरे आगीत खाक झाली. सामाजिक बांधिलकी जपत कोंची जि. प. शाळेच्या शिक्षकांनी संसारोपयोगी साहित्य देत या कुटुंबांना मदत केली.
संगमनेर तालुक्यात कोंची येथे २६ फेब्रुवारी रोजी आदिवासी समाजाच्या चार कुटुंबांतील घराला दुपारी आग लागून संपूर्ण घरासह घरातील धान्य, सर्व कपडे महत्वाचे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाले आहे. या घटनेबाबत जिल्हा परिषदेच्या कोंची येथील शिक्षकांना समजताच पदवीधर शिक्षक निवृत्ती घोडे, राजू बनसोडे व संतोष उपरे यांनी या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच पीडित कुटुंबाला आधार देत किराणा माल, बिछाना, शैक्षणिक साहित्य, कौटुंबिक गरजेच्या वस्तू, कपडे आदी साहित्य या कुटुंबाला सामाजिक भावनेतून सुपूर्द केल्या.
ही मदत पाहून पीडित कुटुंबाला गहिवरून आले. या कुटुंबातील मुले इयत्ता पहिली, तिसरी, चौथी, सहावी व सातवी या वर्गात शिक्षण घेत आहेत. शिक्षकांप्रमाणे इतरांनीही या कुटुंबांना मदत करण्याची गरज व्यक्त होत आहे.