वाड्या-वस्त्यांवर जाऊन शिक्षक करतायेत ज्ञानदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:49+5:302021-07-21T04:15:49+5:30
पठारभागात दुर्गम अनेक गावे व वस्त्या आहेत. अशा ठिकाणी मोबाईलला रेंज पोहोचत नसल्याने अनेक आदिवासी पालकांकडे अँड्राईड मोबाईलची ...

वाड्या-वस्त्यांवर जाऊन शिक्षक करतायेत ज्ञानदान
पठारभागात दुर्गम अनेक गावे व वस्त्या आहेत. अशा ठिकाणी मोबाईलला रेंज पोहोचत नसल्याने अनेक आदिवासी पालकांकडे अँड्राईड मोबाईलची सुविधाही नाही. संगमनेर तालुक्यातील बोटा येथील नाथाबाबा विद्यालयाचे शिक्षक बोटा परिसरातील दुर्गम भागातील आदिवासी वाड्या - वस्त्यांवर जाऊन येथील विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण, अतिदुर्गम भागातील मुलांचे शिक्षणाचे आजही मोठे आव्हान आहे. नाथाबाबा विद्यालयातील शिक्षकांनी याबाबत नवनवे प्रयोग राबवत मार्ग काढला आहे. २१ जूनपासून ५वी ते १२वीचे वर्ग सुरू केले असून, उर्वरित विद्यार्थ्यांसाठी वाडी, वस्त्यांवर जात शाळा भरविण्यास सुरुवात केली आहे.
यात ४० ते ४५ टक्के मुले ऑनलाईन अध्ययनात सहभागी होतात. मात्र, जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी व्हावेत, त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे, यासाठी अशोक साळवे, सचिन फटांगरे, शंकर पानसरे या शिक्षकांनी वैयक्तिक बक्षिसांची योजना आखली आहे. अशोक साळवे यांनी समाजशास्त्र विषयाच्या पाठाचे व्हिडिओ तयार केले असून, ते युट्यूबवर टाकले आहेत.
स्मार्टफोन नसलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी मुख्याध्यापक बाळासाहेब आहेर व पर्यवेक्षक महेंद्र जठार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन वर्ग आटोपल्यानंतर अशोक साळवे, सचिन फटांगरे, शंकर पानसरे हे शिक्षक रोज बोटा परिसरातील दुर्गम भागातील वडदरा, भले वस्ती, काळाखडकवाडी, धरणमळई, कुऱ्हाडे दरा या वाड्या - वस्त्यांवर जाऊन येथील विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. परिसरातील मुले सोशल डिस्टन्सिंग आणि सर्व नियम पाळून हजेरी लावतात. मुलांचे अध्ययन सुरू झाल्याने पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
..............
कोरोना महामारीचा सामना करताना सर्व नियमांचे पालन करून दुर्गम भागातील विद्यार्थी अभ्यासापासून दूर जाऊ नयेत, म्हणून पालकांची भेट घेऊन वाड्या - वस्त्यांवर अध्ययन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थांना दररोज अभ्यास दिला जात असून, तो पालकांच्या मदतीने सोडविण्यास सांगितले जात आहे.
-अशोक साळवे, शिक्षक, नाथाबाबा विद्यालय, बोटा
.......................
आम्ही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो. आमच्याकडे काही पालकांकडे स्मार्टफोन नसल्याने मुलांना ऑनलाईन शिक्षण मिळत नव्हते. नाथाबाबा विद्यालयातील शिक्षक आमच्या वाडीत येऊन मुलांना शिकवत आहेत. यामुळे आम्ही समाधानी आहोत.
- राजेंद्र मेंगाळ, पालक, काळा खडकवाडी, बोटा