शिक्षक दिन विशेष : रिक्षा चालवून मुख्याध्यापकाची गुजराण, विनाअनुदानितची व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 12:05 IST2018-09-05T12:04:45+5:302018-09-05T12:05:32+5:30
रिक्षा चालवून उपजीविकेची वेळ येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकावर आली आहे.

शिक्षक दिन विशेष : रिक्षा चालवून मुख्याध्यापकाची गुजराण, विनाअनुदानितची व्यथा
शिवाजी पवार
श्रीरामपूर : रिक्षा चालवून उपजीविकेची वेळ येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकावर आली आहे. जुनेद इब्राहिम शाह असे त्यांचे नाव असून शहरातील हाजी गुलाम रसूल भिकनशाह उर्दू हायस्कूलच्या स्थापनेपासून (सन २००९) ते शिक्षक म्हणून, तर २०१३पासून मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत.
राज्य सरकारने मुख्याध्यापक पदासाठी अनिवार्य केलेली डीएसएम परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली आहे. याशिवाय टीईटी व टीएआयटी या शिक्षक पदावर कार्यरत राहण्यासाठी आवश्यक परीक्षा त्यांनी पहिल्याच प्रयत्नात सर केल्या. यातूनच त्यांची बुद्धिमत्ता झळकते. शाळेला सरकारी मान्यता आहे. मूल्यांकनानंतर अनुदानासाठी शाळा फेब्रुवारी २०१४ मध्ये पात्र ठरली. मात्र तेव्हापासून आजतागायत सरकारकडून शाळेला एक छदामही मिळालेला नाही. शाळेतून एक रूपयाचे वेतन मिळत नसल्याने आपसूकच जगण्याचे काय? असा प्रश्न त्यांना छेडला, त्यावेळी त्यांचा संघर्ष समोर आला.
एम.ए. बी.एड पर्यंतचे शिक्षण घेणारे जुनेद हे देवळाली प्रवरा येथे राहतात. ते एका एकत्रित कुटुंबाचा भाग आहेत. ते विवाहित आहेत. मात्र मिळकत नसल्याने अजूनही आई-वडिलांवर अवलंबून असल्याचे त्यांना शल्य आहे. याबाबत ते म्हणाले, आई-वडील, भाऊ, पत्नी या सर्वांसह आपलेही स्वप्न धुळीस मिळाले. जीवनाची लढाई केव्हाच हरलो असल्याचे जाणवते. मात्र कसेबसे मनोबल टिकवले असल्याचे जुनेद यांनी सांगितले. आपले कुटुंबीय नोकरी सोडण्याचा आग्रह करतात. मात्र सेवेतील ९ वर्षे व पर्यायाने जीवनातील बहुमोल वेळ खर्ची घातल्याचे दडपण जाणवते. त्यामुळेच नोकरी सुरू ठेवली आहे. शिक्षकाच्या नोकरीतून पैसाच मिळत नसल्याने कुटुंबासाठी रिक्षा चालविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे़
सकाळी श्रीरामपूरला शाळेवर येताना देवळालीतून रिक्षात प्रवासी भरतो. शाळा सुटल्यानंतर पुन्हा देवळालीचे भाडे करीत गावात पोहोचतो. विनावेतन काम करूनही गुणवत्तेच्या बाबतीत शाळा पहिल्या क्रमांकावर आहे. शहरातील तीनही उर्दू शाळांमध्ये दहावीच्या निकालात शाळा सरस ठरते. - जुनेद इब्राहिम शाह