‘तनपुरे’चा बॉयलर कोण पेटविणार?

By Admin | Updated: June 15, 2016 23:45 IST2016-06-15T23:40:31+5:302016-06-15T23:45:57+5:30

सुधीर लंके, अहमदनगर राहुरीच्या डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर गत दोन वर्षे पेटला नाही. पण, सत्तेच्या प्रचाराचा बॉयलर मात्र चांगला धगधगला.

'Tanpura' will boil the boiler? | ‘तनपुरे’चा बॉयलर कोण पेटविणार?

‘तनपुरे’चा बॉयलर कोण पेटविणार?

सुधीर लंके, अहमदनगर
राहुरीच्या डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर गत दोन वर्षे पेटला नाही. पण, सत्तेच्या प्रचाराचा बॉयलर मात्र चांगला धगधगला. या कारखान्याची चावी मतदार कोणाच्या हाती सोपविणार याची जिल्ह्याला उत्सुकता लागली आहे. ‘तनपुरे’च्या निवडणुकीवर पुढची बरीच राजकीय समीकरणे ठरणार आहेत.
दिवंगत डॉ. बाबुराव तनपुरे यांनी या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. गावोगावी फिरुन त्यांनी कारखान्यासाठी भागभांडवल जमा केले. महिलांनी स्वत:चे दागिने या कारखान्यासाठी विकले. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात फिरताना बाबुरावांच्या अशा अनेक आठवणी जागोजागी ऐकायला मिळतात. पण, राहुरीच्याच नेतेमंडळींना हा भरभक्कम वारसा नीट जपता आला नाही. ज्या कारखान्याने राज्यात कधीकाळी उच्चांकी भाव दिला, त्या कारखान्यावर आज ३०० कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा आहे.
कारखान्याच्या निवडणुकीत प्रसाद तनपुरे, शिवाजी गाडे व शिवसेनेचे रावसाहेब खेवरे यांची ‘एकता’ एक्सप्रेस धावली. प्रवरेच्या डॉ. सुजय विखेंच्या नेतृत्वाखालील परिवर्तन मंडळ व सेवानिवृत्त कामगार आयुक्त सुभाषचंद्र येवले यांच्या नेतृत्वाखालील उत्कर्ष मंडळ असा तिरंगी सामना आहे. तीनही मंडळांनी प्रचारात कारखाना सुरू करण्याचा दावा केला आहे.
प्रसाद तनपुरे व शिवाजी गाडे हे विधानसभेला एकमेकांच्या विरोधात लढले. पण, राहुरीवर विखे यांचे बाह्य आक्रमण होत आहे, या मुद्यावर ते आता एकत्र आले. कारखाना जगविण्यापेक्षा त्यांना विखे यांची चिंता मोठी दिसते हे त्यांच्या भाषणांवरुन जाणवले. प्रसाद तनपुरेंऐवजी अरुण तनपुरे व प्राजक्त तनपुरे यांच्याकडे प्रचाराची बरीचशी सूत्रे होती. अरुण तनपुरे यांनी बाजार समितीचे मॉडेल यशस्वी केले आहे. तेच आता कारखानाही सुरळीत करतील, असे ठसविण्याचा प्रयत्न झाला.
सुजय विखे हेही प्रचारात आक्रमक दिसले. ते राजकारणात नवीन आहेत. पण त्यांची भाषणे मुरब्बी राजकारण्यासारखी होती. अजित पवारांनी या मंडळींना मैदानात उतरविले आहे. आता कारखाना सुरु करायला निघालेली ही मंडळी इतके दिवस कोठे होती? हा प्रश्न त्यांनी राहुरीकरांना केला. सत्ता द्या, लगेच सभासदांची व कामगारांची देणी देऊन बॉयलर पेटवितो, असे त्यांनी जाहीरच केले.
खासगी कारखाना चालतो मग सहकार कसा मोडीत निघतो, असा मुद्दा मांडत राधाकृष्ण विखे यांनी थेट ‘प्रसाद शुगर’ वर हल्ला केला. सुभाषचंद्र येवले यांनीही सर्वसामान्य शक्तीचा एक तिसरा पर्याय उभा केला. रायगड बँकेच्या माध्यमातून पैसा आणून आपण कारखाना सुरु करु, असा त्यांचा दावा आहे.
राहुरीची ही निवडणूक केवळ कारखान्यापुरती मर्यादित नाही म्हणूनच ती एवढी गाजली. राहुरीकरांच्या भांडणात यापूर्वी त्यांच्या हातून आमदारकी निसटली. आता कारखानाही आपल्या हातून जाणार, याची त्यांना भिती आहे. सुजय विखे हे नगरमधून लोकसभा निवडणूक लढविणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. सुभाष पाटील यांनी तसे राहुरीच्या सभेत जाहीरच करुन टाकले. त्यामुळे सुजय यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने बांधणी सुरु केलीय, असे म्हणण्यास वाव आहे. राहुरी कारखाना ताब्यात आला तर हा मतदारसंघच विखे यांच्या ताब्यात येणार आहे. त्यामुळेच राहुरीचे स्थानिक नेते धास्तावले आहेत.
अर्थात सभासदांना आपले-बाहेरचे यापेक्षा कारखाना जगणे व उसाला भाव मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते कोणाला बॉयलर पेटविण्याची संधी देणार, हे गुरुवारी ठरेल.
कर्डिले नेमके कोणाचे?
आमदार शिवाजी शिवाजी कर्डिले यांच्या टोपीखाली दडलेय काय? याचा अंदाज कोणालाच येत नाही. या निवडणुकीतही त्यांनी धूर्तपणा केला. ‘जो जिंकेल त्याच्या पाठिशी मी राहणार’ असा भिंतीवरील तसबिरीत दिसणाऱ्या स्वामींसारखा अजब पवित्रा त्यांनी घेतला. कोणीही जिंका रिमोट माझ्याकडे राहणार, असे त्यांना ठसवायचे आहे. अर्थात ते खरोखरच तटस्थ आहेत की आतून कोणाला रसद पुरविणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
राहुरी कारखान्याला पात्रता नसताना जिल्हा बँकेने एवढे कोट्यवधीचे कर्ज कसे दिले? या मुद्याचा कर्डिले यांनी निवडणुकीत खुलासा करायला हवा होता. रामदास धुमाळ यांच्याकडेही ‘तनपुरे’ची सत्ता होती. मात्र, ते प्रचारात अलगद बाजूला राहिले.

Web Title: 'Tanpura' will boil the boiler?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.