आवश्यक तेथे टँकर !
By Admin | Updated: May 24, 2014 00:39 IST2014-05-23T23:52:54+5:302014-05-24T00:39:42+5:30
अहमदनगर : पाणीटंचाई परिस्थिती पाहता आवश्यकता असेल तेथे तात्काळ टँकर सुरु करा, असे आदेश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

आवश्यक तेथे टँकर !
अहमदनगर : पाणीटंचाई परिस्थिती पाहता आवश्यकता असेल तेथे तात्काळ टँकर सुरु करा, असे आदेश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. थोरात यांनी प्रारंभी पाणीटंचाईचा आढावा घेतला. पाणी ही जीवनावश्यक गोष्ट असून जनतेला पाण्याची टंचाई भासू नये यासाठी तात्काळ उपाय योजना आखण्यात याव्यात. टँकर मागणीचा प्रस्ताव आल्यानंतर त्याची तपासणी करुन प्राधान्याने मंजूर करण्यात यावा. उपलब्ध टँकर, मंजूर खेपा यावर योग्य ते नियंत्रण ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. गेल्यावर्षी जिल्ह्यात सुमारे ७०० टँकर सुरू होते. सध्या सुमारे दोनशे टँकर सुरू आहेत. जनतेला त्रास होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. मंजूर करण्यात आलेल्या टँकरच्या खेपा वेळेवर होतील, याबाबत संबंधितांना आदेश देण्यात यावेत, या कामी कुचराई करणार्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तहसील कार्यालयांमध्ये विविध दाखल्यांसाठी विद्यार्थी आणि पालकांची गर्दी होत असून तहसीलदार तसेच संबंधितांनी दाखले तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना थोरात यांनी दिल्या. लवकरच तालुकानिहाय सुवर्ण जयंती राजस्व अभियानाचा आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जानेवारी ते मार्च या कालावधीसाठी राबविण्यात आलेल्या पाणीटंचाई उपाययोजनांसाठी १४ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पूर्वीच्या उपाययोजनांची देयके भागविण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जावा, असेही बैठकीत सुचविण्यात आले.(प्रतिनिधी)