तलाठी भरती संशयाच्या भोवऱ्यात
By Admin | Updated: March 17, 2016 23:42 IST2016-03-17T23:33:34+5:302016-03-17T23:42:46+5:30
अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने यावर्षी घेतलेल्या तलाठी भरतीत गैरप्रकार झाल्याचे एक उदाहरण समोर आले आहे. एका उमेदवाराच्या जागेवर डमी उमेदवार बसविण्यात आल्याची तक्रार झाली आहे.

तलाठी भरती संशयाच्या भोवऱ्यात
अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने यावर्षी घेतलेल्या तलाठी भरतीत गैरप्रकार झाल्याचे एक उदाहरण समोर आले आहे. एका उमेदवाराच्या जागेवर डमी उमेदवार बसविण्यात आल्याची तक्रार झाली आहे. या उमेदवाराला जे प्रवेशपत्र देण्यात आले त्यावरील छायाचित्रही अत्यंत अस्पष्ट आहे. त्यामुळे असे प्रकार अन्य उमेदवारांबाबतही घडले आहेत का? असा संशय निर्माण झाला आहे.
तलाठी भरतीसाठी गत १३ सप्टेंबरला परीक्षा झाली. या भरतीतून निवड झालेल्या काही उमेदवारांना नियुक्त्याही देण्यात आल्या आहेत. मात्र, एका उमेदवाराबाबत प्रशासनाला निनावी तक्रार प्राप्त झाली आहे. या उमेदवाराने आपल्या भावाला डमी म्हणून परीक्षेला बसविले. विशेष म्हणजे हा उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण झाला असून त्याला नियुक्ती मिळणार आहे. या उमेदवाराचे प्रवेशपत्र ‘लोकमत’च्या हाती आले असून त्यावर उमेदवाराचे छायाचित्र हे अत्यंत अस्पष्ट असल्याने या संशयाला पुष्टी मिळत आहे.
भरतीसाठी प्रशासनाने आॅनलाईन अर्ज मागविले होते. उमेदवाराचे छायाचित्र अस्पष्ट असताना ते कसे स्वीकारले गेले? परीक्षागृहात पर्यवेक्षकाने या बाबीला आक्षेप का घेतला नाही? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. हे एक उदाहरण समोर आले असले तरी आता निवड झालेल्या अन्य उमेदवारांचे अर्ज व प्रत्यक्षात परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे तपासून खातरजमा करण्याची गरज निर्माण झाली आहे. तक्रार झालेल्या उमेदवाराने मूळ अर्जावरच डमी उमेदवाराचे छायाचित्र दिल्याचा संशय आहे. (प्रतिनिधी)
तलाठी भरतीत एका उमेदवाराबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. या उमेदवाराचे प्रवेशपत्र संशयास्पद आहे. त्याबाबत चौकशी सुरु असून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल.
-हेमलता बडे, तहसीलदार,
महसूल विभाग.