अहमदनगर : पारनेर तालुक्यातील निघोजचे नवनिर्वाचित उपसरपंच ज्ञानेश्वर विठ्ठल वरखडे यांनी येथील तलाठ्याला मारहाण केली. हा प्रकार सोमवारी घडला. याबाबत तलाठी विनायक निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
निघोजचे उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे यांचा एक कार्यकर्ता तलाठी निंबाळकर यांच्याकडे काम घेऊन गेला होता. मला सरपंचाने पाठविले आहे. माझे काम करा. तेव्हा तलाठी निंबाळकर म्हणाले, तुम्हाला थांबावे लागेल. माझ्यासमोर काम सुरू आहे. त्यानंतर त्या कार्यकर्त्याने फोनवर ही माहिती वरखडे यांना सांगितली. वरखडे यांनी तलाठी कार्यालयात प्रवेश करून निंबाळकर यांना शिवीगाळ करून मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानंतर निंबाळकर यांनी पारनेर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. पोलिसांनीही तत्काळ ज्ञानेश्वर वरखडे याला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप करत आहेत.